संवेदनशील परिस्थितीत हायकोर्टाला संयम बाळगायला सांगू नका!

कोविड संसर्गाच्या उद्रेकावरून मद्रास हायकोर्टाने झापल्यामुळे होणारी नाचक्की टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणाऱया निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाने आज फटकारले. कोविडसारख्या संवेदनशील परिस्थितीत हायकोर्टाला संयम बाळगायला सांगू नका. उच्च न्यायालये ही लोकशाहीची महत्त्वपूर्ण आधारस्तंभ आहेत. त्यामुळे हायकोर्टाच्या अधिकारांचे खच्चीकरण करणे योग्य नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाची कानउघाडणी केली.

कोरोनाचा कहर वाढला असून ऑक्सिजन, औषधांचा तुटवडा व इतर समस्यांप्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली होती. हायकोर्टाने याप्रकरणी निवडणूक आयोगावर ताशेरे ओढत निवडणुकीदरम्यान कोविड प्रोटोकॉल पाळण्यात अपयशी ठरल्याबद्दल आयोगावर खुनाच्या आरोपाचा ठपका ठेवला पाहिजे, असे गंभीर निरीक्षण नोंदवले होते. याविरोधात निवडणूक आयोगाने ज्येष्ठ वकील राकेश द्विवेदी यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

या याचिकेवर न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी अॅड. द्विवेदी यांनी कोर्टाला सांगितले की, मद्रास हायकोर्टाच्या या निरीक्षणामुळे निवडणूक आयोगाला दुःख झाले आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, हायकोर्टाकडून वकील व पक्षकारांना अनेकदा सुनावले जाते; पण कोरोनाच्या संकटात निवडणूक आयोगाकडून झालेल्या काही चुका पाहता आयोगाने कोर्टाच्या नोंदी व निरीक्षणे कडू गोळय़ांसारखी घेतली पाहिजेत. त्यावर निवडणूक आयोगाच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला की, निवडणूक प्रचार सभा, रॅलीत भाग घेणाऱया लोकांना ताब्यात ठेवण्याइतपत आपल्याकडे स्टाफ नाही. एवढेच काय तर, कोविडच्या काळात आपल्याला तसे विशेष हक्कही नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने हा युक्तिवाद ऐकून घेत सुनावणी मंगळवारपर्यंत तहकूब केली.

वार्तांकन करणाऱया मीडियावर बंदी घालता येणार नाही

कोर्टाची तोंडी निरीक्षणे नोंदवून ती प्रसिद्ध करणाऱया मीडियावर बंदी घालण्याची मागणी सुनावणीदरम्यान निवडणूक आयोगाने केली; मात्र आयोगाला दिलासा देण्यास नकार देत मीडियावर बंदी घालता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. प्रसारमाध्यमे ही लोकशाहीवर लक्ष ठेवणारी प्रमुख यंत्रणा आहे त्यामुळे वार्तांकन करण्यापासून त्यांना रोखले जाऊ शकत नाही असेही न्यायमूर्ती यावेळी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या