चांदेकसारेत शाळेची इमारत बांधण्याचा मार्ग मोकळा, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

समृद्धी महामार्गात बाधित झालेली जागा व इमारत याबाबतचा निकाल भारत सर्व सेवा संघ पाचेगाव, न्यू इंग्लिश स्कूल कमिटी चांदेकसारेच्या बाजूने गेल्या महिन्यात छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दिला होता. याविरोधात चांदेकसारे न्यू इंग्लिश कमिटी ट्रस्ट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. संभाजीनगर खंडपीठाने दिलेला निकाल गृहीत धरून न्यू इंग्लिश स्कूल चांदेकसारे ट्रस्टची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. स्कूल इमारत बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील न्यू इंग्लिश स्कूलची इमारत व जागा समृद्धी महामार्गात बाधित झाली होती. यातून दोन कोटी 72 लाख रुपये विद्यालयाला मिळाले होते. मिळालेले पैसे कोणाचे? यावर दोन्ही कमिटय़ांमध्ये वाद सुरू होता. यावरून न्यू इंग्लिश स्कूल चांदेकसारे ट्रस्ट यांनी संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली होत़ी अखेर संभाजीनगर खंडपीठाचे न्यायाधीश नितीन सूर्यवंशी यांनी भारत सर्व सेवा संघ पाचेगाव, न्यू इंग्लिश स्कूल कमिटी चांदेकसारे यांच्या बाजूने निकाल दिला होता. त्यामुळे अनेक दिवसांपासून रेंगाळत पडलेला इमारतीचा प्रश्न मार्गी लागणार, यावर शिक्कामोर्तब झाला असताना संजय होन यांनी आपल्या ट्रस्टच्या वतीने पुन्हा सुप्रीम कोर्टात 17 मे 2023 रोजी याचिका दाखल केली होती.

गुरुवारी (1 रोजी) सुप्रीम कोर्टाने संभाजीनगर खंडपीठाने दिलेला निकाल गृहीत धरून संजय होन यांची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे चांदेकसारे न्यू इंग्लिश स्कूल इमारतीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला. न्यू इंग्लिश स्कूल कमिटी चांदेकसारे यांच्या वतीने ऍड. व्ही. डी. सपकाळ, पी.
एस. पवार, एन. आर. कांतेश्वरकर यांनी काम पाहिले.

पाच वर्षे न्यायालयीन लढा सुरू असताना 700 विद्यार्थ्यांचे भवितव्य डोळ्यांसमोर ठेवून दोन पावले मागे-पुढे होण्यास आम्ही तयार होतो. मात्र, प्रतिवादी संजय होन यांच्या ट्रस्टने ऐकले नाही. लोकन्यायालय संभाजीनगर खंडपीठ व आता सुप्रीम कोर्टाने त्यांची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे चांदेकसारे विद्यालयाची इमारत बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वांना विश्वासात घेऊन सुसज्ज अशी भव्य-दिव्य डिजिटल इमारत बांधणार आहे.

– शंकरराव चव्हाण, उपाध्यक्ष न्यू इंग्लिश स्कूल कमिटी, चांदेकसारे