
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेऊन सव्वा महिना लोटल्यानंतर अखेर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी झाला. त्यामुळे, सर्वांचेच लक्ष 12 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्वोच्च न्यालयातील सुनावणीकडे लागले होते. मात्र, आता ही सुनावणी पुन्हा एकदा तब्बल 10 दिवस पुढे ढकलली आहे.
शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष सर्वोच्च न्यायालयात गेल्यामुळे आता, न्यायालयाचा निर्णय काय येतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिवसेना आणि शिंदे गटाच्या याचिकांवर सुनावणी 8 ऑगस्ट रोजी होणार होती. ती 12 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली असून ती आता 22 ऑगस्ट रोजी होणार आहे.
या सुनावणीचा सर्वात मोठा परिणाम हा राज्यातील राजकारणावर होणार आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा हे 26 ऑगस्टला निवृत्त होणार असल्याने त्यांच्याच घटनापीठासमोर ही सुनावणी कायम राहिल याची शक्यता आता कमी आहे. या आधी सरन्यायाधीश रमण्णा यांनी या प्रकरणावर सुनावणी करताना अत्यंत कडक अशा शब्दात ताशेरे ओढले होते. त्यामुळे आता या प्रकरणाचं काय होईल हे 22 तारखेला स्पष्ट होणार आहे.
ही सुनावणी दहा दिवसांना लांबणीवर का गेली यामागे काय कारण आहे हे मात्र स्पष्ट झालेलं नाही. राज्यातील सत्तासंघर्षाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयासमोर एकूण सहा याचिका आहेत. त्यामुळे सर्व सहा याचिका एकत्रितपणे घटनापीठाकडे सोपवल्या जातील की सरन्यायाधीशांच्या समोरच याची सुनावणी होईल हे येत्या 22 ऑगस्टला स्पष्ट होणार आहे.