सात महिने जामिनावर सुनावणी होत नाही हे एखाद्याचा जगण्याचा अधिकार हिरावून घेण्यासारखे

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज अनेक महिने प्रलंबित ठेवणाऱया मुंबई उच्च न्यायालयावर आज सर्वोच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढले. जामिनाचा अर्ज सात महिने पडून राहतो कसा? असे करणे म्हणजे एखाद्याचा जगण्याचा अधिकार हिरावून घेण्यासारखे आहे. कलम 21 अन्वये कायद्याने तो अधिकार देशातील प्रत्येक नागरिकाला दिला आहे, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्जावर ताबडतोब सुनावणी घेण्याचे आदेश दिले.

मनीलॉण्डरिंगच्या कथित प्रकरणी अनिल देशमुख यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नोव्हेंबर 2021 मध्ये अटक केली. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. उच्च न्यायालयात न्यायमूर्ती एन. जे. जामदार यांच्या न्यायालयात त्यांचा खटला सुरू आहे.

गेल्या 21 मार्च रोजी देशमुख यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. परंतु अद्याप त्यावर सुनावणी घेण्यात आलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठाने त्याची गंभीर दखल घेतली.

‘‘एखादी व्यक्ती जामिनासाठी अर्ज करते तेव्हा ती याचिका लवकरात लवकर निकालात काढली जाईल आणि आपल्याला न्याय मिळेल अशी तिची अपेक्षा असते. जामीन याचिका प्रलंबित ठेवणे हे राज्यघटनेच्या कलम 21 अन्वये मिळालेल्या जगण्याच्या अधिकाराशी सुसंगत नाही.’’ असे खंडपीठाने सांगितले.

यानंतर खंडपीठाने अनिल देशमुख यांना दिलासा देणारा आदेश दिला. ‘ज्या न्यायमुर्तींसमोर खटला सुरू आहे त्यांच्या न्यायालयात याचिकाकर्ते देशमुख यांनी उद्याच अर्ज करावा. तो अर्ज याच आठवडयात सुनावणीसाठी घेऊन त्यावर तातडीने निर्णय घेतला जाईल.’ असे आदेश खंडपीठाने उच्च न्यायालयाला दिले. या प्रकरणावर इतर कोणतेही मत न्यायालयाने व्यक्त केले नाही.

कलम 21 काय आहे?

कलम 21 अन्वये देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या जीविताचे संरक्षण आणि व्यक्तीस्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार मिळतो. म्हणजेच हे कलम नागरिकाला जगण्याचा अधिकार प्रदान करते. तो अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न इतर व्यक्ती किंवा संस्थांकडून झाला तर त्यांच्याविरोधात तो नागरिक सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो.

जॅकलीन फर्नांडिसला जामीन मंजूर

200 कोटींच्या घोटाळाप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिला दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने आज 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला. आरोपी सुकेश चंद्रशेखरकडून जॅकलिनने कोटय़वधींची भेटवस्तू स्वीकारल्याचा आरोप आहे.