मुंबई उच्च न्यायालयात दाद मागा! सर्वोच्च न्यायालयाचा खातेदारांना दिलासा नाही

261

पीएमसी बँक खातेदारांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास होकार दिल्यामुळे काही सकारात्मक निर्णय येऊ शकेल असे वाटत असताना आज न्यायालयाने खातेदारांना दिलासा देण्यास नकार दिला. या प्रकरणी तुम्ही मुंबई उच्च न्यायालयात दाद मागा, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने खातेदारांना दिला आहे.

पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळय़ानंतर खातेदारांवर पैसे काढण्याबाबत घालण्यात आलेले निर्बंध मागे घ्यावेत. तसे आदेश न्यायालयाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला द्यावेत या मागणीसाठी बेजोनकुमार मिश्रा यांनी 500 खातेदारांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, मात्र ही याचिका सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने फेटाळली. खातेदार सध्या स्वतःच्या खात्यातून सहा महिन्यांत 40 हजारांपर्यंतची रक्कम काढू शकतात.

सरकारचे पूर्ण लक्ष
केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाने पीएमसीच्या सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली. पीएमसी बँकेच्या सध्याच्या स्थितीवर सरकारचे पूर्ण लक्ष आहे. अंमलबजावणी संचालनालय दोर्षीवर योग्य ती कारवाई करत आहे अशी माहितीही मेहता यांनी दिली.

मुंबईत मंगळवारी सुनावणी
मुंबई उच्च न्यायालयातही कन्झुमर ऍक्शन नेटवर्क (कॅन)तर्फे याचिका दाखल करण्यात आली आहे. पीएमसी बँकेवर आरबीआयने लादलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे खातेदारांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहेत. निर्बंध लादल्यामुळे तीन खातेदारांचा धसक्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे हे निर्बंध हटवून खातेदारांना दिलासा द्यावा अशी मागणी कॅनने केली आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.

आणखी एका खातेदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या (पीएमसी) घोटाळय़ाने आणखी एका खातेदाराचा शुक्रवारी बळी घेतला आहे. बँकेच्या मुरलीधर धारा या 83 वर्षीय खातेदाराकडे हृदयविकारावरील उपचारासाठी पैसेच नसल्याने त्याचा अखेर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती मृत मुरलीधर यांचा मुलगा प्रेम धारा याने दिली. या आधी संकटात सापडलेल्या पीएमसी बँकेचे खातेदार संजय गुलाटी, फत्तेमल पंजाबी यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, तर महिला डॉक्टर खातेदाराने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या