
औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामांतर करण्याच्या निर्णयाāला आव्हान देणारी याचिका शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालय सोमवारी सुनावणी करणार आहे. याचिकाकर्त्याने तेथे आपले म्हणणे मांडावे, आम्ही या याचिकेवर सुनावणी घेणार नाही, असे स्पष्ट करीत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने याचिकेत हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामांतर करण्यास पेंद्र आणि महाराष्ट्र सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे. याविरोधात मोहम्मद मुश्ताक अहमद या रहिवाशाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सरन्यायाधीश चंद्रचूड, न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह आणि न्यायमूर्ती जे. बी. परडीवाला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. महाराष्ट्र सरकारतर्फे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी बाजू मांडली. त्यांनी नामांतरासंबंधी मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार असल्याचे खंडपीठाला कळवले. त्याची दखल घेत खंडपीठाने याचिका धुडकावून लावली.