फी माफीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

586
supreme-court

शाळांच्या फीमाफीसाठी तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावात शाळा पुन्हा सुरू करण्याविरोधात देशभरातील पालकांनी केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्या पालकांना आधी उच्च न्यायालयात याप्रकरणी याचिका दाखल करण्याची सूचना केली आहे. या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्यातील पालक आठवडाभरात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.

कोरोनामुळे देशभरातील शाळा बंद असल्या तरी शाळाचालकांनी अवाच्यासवा फीवाढ केली आहे. याविरोधात आठ राज्यातील पालकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. शाळा बंद असल्याने केवळ शैक्षणिक शुल्क घेण्याची शाळांना परवानगी देण्यात यावी. त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या इतर फीचा समावेश असू नये, अशी मागणी पालकांनी केली होती. तसेच या याचिकेत पालकांनी प्रभावी लस आल्याशिवाय प्रत्यक्ष शाळा सुरु करण्यात येऊ नये, असेही म्हटले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी पालकांना आधी उच्च न्यायालयात दाद मागण्याची सूचना केली आहे.

तांत्रिक बाबीनुसार याचिका फेटाळली
शालेय फी संदर्भात नियम करणे सहज शक्य होते मात्र सर्वोच्च न्यायालयाने दखल न घेणे हे दुर्दैवी आहे. केवळ तांत्रिक बाबीला अनुसरून ही याचिका फेटाळल्याने आता राज्यातील विविध उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत, असे मुख्य याचिकाकर्ते सुशील शर्मा यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या