हेट क्राईमला हिंदुस्थानात स्थान नाही – सर्वोच्च न्यायालय

हेट क्राईमला हिंदुस्थानात मुळीच स्थान नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. हेट स्पीच व हेट क्राईमच्या मुद्यावर न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. हिंदुस्थानसारख्या धर्मनिरपेक्ष देशात धार्मिक आधारावर हेट क्राईम करण्यासाठी कोणतेही स्थान नाही. देशात हेट स्पीच अर्थात द्वेषपूर्ण भाषणांच्या घटना वाढत असल्याचेही न्यायालयाने निदर्शनास आणून दिले. या प्रकरणी कोणतीही तडजोड करता येणार नसल्याचे सांगत या प्रकरणांतील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची जबाबदारी राज्याची आहे.

२०२१ मध्ये नोएडातील ६२ वर्षीय काझीम अहमद शेरवाणी हेट क्राईमला बळी पडले होते. या प्रकरणी सुनावणी करताना न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली. हेट स्पीचच्या वाढत्या प्रकरणांविषयी सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली. राज्याने अभद्र भाषेची समस्या मान्य केली तरच तिच्यावर तोडगा काढता येतो. याशिवाय न्यायालयाने पोलिसांना प्रश्न केला की, हेट क्राईम ओळखले जाणार की ते दडपण्याचा प्रयत्न केला जाणार? हा द्वेषाचा गुन्हा आहे. तुम्ही ते कार्पेटखाली दाबून टाकणार का? असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. एखादा व्यक्ती पोलिसांकडे आला व मी टोपी घातल्यामुळे माझी दाढी खेचून शिवीगाळ करण्यात आली असे म्हणाला. त्यानंतरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही, तर ही एक समस्या आहे. अशा पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे. पोलीस ठाण्यात येणार्‍यांच्या मनात गुन्हेगाराची भावना निर्माण होता कामा नये, असेही न्यायालयाने सांगितले.

याचिकाकर्त्यांनी आरोप केला होता की, 4 जुलै रोजी तो नोएडाच्या सेक्टर 37 मध्ये अलीगडला जाणार्‍या बसची वाट पाहत होता. तेव्हा काही लोकांनी त्यांना लिफ्ट देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर त्यांनी मुस्लिम असल्यामुळे त्याला मारहाण करत शिवीगाळ केली. पीडित नोएडाच्या सेक्टर ३७ मध्ये एका पोलीस ठाण्यात गेला. तिथे सीनियर पोलीस अधिकारी नव्हते. केवळ कॉन्स्टेबल उपस्थित होता. त्यामुळे कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.