अकोला दंगल प्रकरण, एसआयटी स्थापनेच्या आदेशाला स्थगिती

2023 मध्ये अकोला येथे झालेल्या दंगलीच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने याआधी दिलेल्या स्वतःच्याच आदेशाला स्थगिती दिली आहे. दंगलीसंबंधित आरोपांची चौकशी करण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समुदायांच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असलेले विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिले होते. त्या आदेशाला तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने स्थगिती दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने 11 सप्टेंबरला अकोला दंगलीच्या तपासाची निष्पक्षता राखण्यासाठी एसआयटीमध्ये हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समुदायांतील अधिकाऱ्यांचा समावेश करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशावर महाराष्ट्र सरकारने हरकत घेतली होती. गणवेशधारी पोलीस अधिकाऱ्यांकडे धर्म किंवा जात या दृष्टिकोनातून पाहणे चुकीचे असल्याचे सरकारने म्हटले होते.