सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी ‘हमारे बारह’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली आहे. तसेच त्यांनी चित्रपटाचा टीझर पाहिला आणि तो ‘आक्षेपार्ह’ असल्याचं सांगितलं.
‘आम्ही सकाळी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला आहे आणि ट्रेलरमध्ये सर्व आक्षेपार्ह संवाद आहेत’, असं न्यायालयानं त्यांचा आदेश सुनावताना म्हटलं आहे.
हा टीझर ‘आक्षेपार्ह’ गोष्टींनी भरलेला असल्याचे अधोरेखित करून, सर्वोच्च न्यायालयानं हा चित्रपट इस्लामिक धर्माचा, विशेषतः विवाहित मुस्लिम महिलांसाठी अपमानास्पद असल्याच्या आरोपांची दखल घेतली.
न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या सुट्टीतील खंडपीठासमोर या चित्रपटाच्या प्रदर्शनाला मंजुरी देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी सुरू होती.
अझहर बाशा तांबोळी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर खंडपीठानं मुंबई उच्च न्यायालयाला त्वरीत निर्णय घेण्यास सांगितलं.
याचिकाकर्त्याचं प्रतिनिधित्व करताना, वकील फौजिया शकील यांनी सांगितलं की, उच्च न्यायालयानं ‘अयोग्य आदेश’ देऊन चित्रपटाच्या प्रदर्शनावरील स्थगिती उठवली.
या आठवड्याच्या सुरुवातीला अन्नू कपूरच्या ‘हमरे बारह’ या चित्रपटावर कर्नाटकातही बंदी घालण्यात आली होती.