आरोपीची न्यायालयातच हत्या करणाऱ्या ७ जणांची जन्मठेप कायम

47

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

पिंटू शिर्के नावाच्या व्यक्तीची नागपूरच्या न्यायालयातच हत्या करणाऱ्या ७ जणांची जन्मठेप सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे  २००१ साली पिंटू शिर्केची विजय मते आणि त्याच्या साथीदारांनी न्यायालयात हत्या केली होती. सुनावणीसाठी आणत असताना मते आणि त्याच्या मित्रांनी पिंटूची धारदार शस्त्रांनी वार करत हत्या केली होती.

विजय मते आणि पिंटू शिर्के यांच्या जमिनीवरून वाद होता. राजे रघूजी भोसले परिवारातील महाराणी अन्नापूर्णा देवी भोसले यांनी सक्करदऱ्यातील २१ एकर जमीन शिर्के कुटुंबाला भेट दिली होती. या जमिनीवर विजय मतेने अतिक्रमण केलं होतं, यावरून पिंटू शिर्के आणि विजयमध्ये वाद झाला होता. या वादातून पिंटूने विजयवर १८ जुलै २००१ रोजी गोळीबार केला होता, त्यानंतर त्याच्या साथीदाराची हत्याही केली होती. याचा बदला घेण्यासाठी विजयने त्याच्या साथीदारांसह पिंटूची हत्या केली होती.

१८ ऑक्टोबर २०१३ रोजी सत्र न्यायालयाने प्रकरणातील १५ पैकी ८ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. यातील अयूब खान नावाच्या आरोपीची नागपूर खंडपीठाने निर्दोष मुक्तता केली होती तर उरलेल्या ७ जणांची जन्मठेप कायम ठेवली होती. राज्य सरकारने आणि पिंटू शिर्केच्या आईने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने नागपूर खंडपीठाचा निर्णय कायम ठेवत विजय किसनराव मते, राजू विठ्ठलराव भद्रे, उमेश संपतराव डहाके, रितेश हिरामण गावंडे, किरण उमराव कैथे, कमलेश सीताराम निंबर्ते व दिनेश देवीदास गायकी यांची जन्मठेप कायम ठेवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या