सुप्रिमो चषकाचा थरार आजपासून,युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन

45

सामना ऑनलाईन,मुंबई

हिंदुस्थानातील तमाम क्रीडाप्रेमींच्या नजरा खिळून राहिलेल्या सुप्रिमो चषकाचा धमाका उद्यापासून सांताक्रुझमधील एअर इंडिया ग्राऊंडमध्ये पाहायला मिळणार आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते टेनिस चेंडूने खेळवण्यात येणाऱया हिंदुस्थानातील नंबर वन स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडेल. शिवसेनेचे विभागप्रमुख-आमदार संजय पोतनीस व शिवसेनेचे विभागप्रमुख-आमदार ऍड. अनिल परब यांचा पुढाकार, अथक परिश्रम व दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर सातव्या वर्षात पदार्पण करणाऱया या स्पर्धेत तब्बल दहा लाख रुपयांच्या बक्षिसांचा पाऊस पाडण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत उमर इलेव्हन आणि दहिसर बॉईज यांच्यामध्ये खडाजंगी होईल.

सुप्रिमो चषकासाठी (खुला गट) देशभरातील सर्वोत्तम १६ संघांमध्ये जेतेपदासाठी कमालीची चुरस पाहायला मिळणार आहे. आयपीएलच्या तोडीची स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेत मालिकावीर ठरणाऱया क्रिकेटपटूला अल्टो कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्तम फलंदाज मोटार बाईक तर सर्वोत्तम गोलंदाज स्कूटीचा मानकरी ठरेल. बुधवारी होणाऱया स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, मुंबईचे महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर, माजी कसोटीपटू साईराज बहुतुले, माजी रणजीपटू अमोल मुजुमदार यांसह इतर मान्यवरांची उपस्थिती आकर्षणाचा केंद्रबिंदू असणार आहे.

सहा गेट सज्ज

सुप्रिमो चषकातील लढती ज्या एअर इंडिया ग्राऊंडवर खेळवण्यात येणार आहेत तिथे सहा भव्यदिव्य गेट उभारण्यात आले आहेत. पहिल्या गेटला स्वर्गीय माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे, दुसऱया गेटला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, तिसऱया गेटला आदित्य ठाकरे, चौथ्या गेटला उद्धव ठाकरे असे नाव देण्यात आले आहे. शिवाय प्रमुख पाहुण्यांसाठी सुप्रिमो क्रीडांगण नगरीत २०० फुटांचे प्रवेशद्वार (ब्रिज) तयार करण्यात आले. यामधून त्यांना थेट मैदानात प्रवेश करता येणार आहे.

थीम साँग, ढोलताशे, फटाक्यांची आतषबाजी अन् नृत्य

सुप्रिमो चषकाच्या उद्घाटनाप्रसंगी या स्पर्धेच्या नावाचे थीम साँग  वाजवण्यात येणार आहे. यावेळी ढोलताशांच्या गजरात नृत्याचा नजराणा तमाम क्रिकेटप्रेमींना ‘याचि डोळा याचि डोळा’ पाहायला मिळेल. तसेच मैदानाच्या चोहोबाजूंनी फटाक्यांची आतषबाजी होईल. विशेष लाइटची व्यवस्थाही याप्रसंगी करण्यात आली आहे. ७०-७० स्पोर्टस्च्या पुढाकारामुळे मैदानातील स्वयंसेवक रंगीबेरंगी कपडय़ात दिसतील हे विशेष. तसेच १५ ते २० हजार क्रिकेटप्रेमींना लढतीचा आनंद घेता येईल अशी आसनव्यवस्था (प्रेक्षक गॅलरी) करण्यात आली आहे.

दिग्गज क्रिकेटपटू बॉलीवूड स्टार्समध्ये लढत

यंदाच्या सुप्रिमो चषकाचे प्रमुख आकर्षण असणार आहे ते दिग्गज क्रिकेटपटू व बॉलीवूड स्टार्स यांच्यामधील क्रिकेट लढत… या लढतीत संदीप पाटील, लालचंद राजपूत या माजी क्रिकेटपटूंसह सिने मंडळी एकमेकांसमोर उभी ठाकणार आहेत.

सुप्रिमो चषक स्पर्धेत सहभागी होणारे संघ खालीलप्रमाणे

अर्जुन संघटना बुतबोरी (नागपूर), दहिसर बॉईज (दहिसर), एकता गुजरात (गुजरात), शिरवणे किरण इलेव्हन (सॅण्डी एसपी), मराठा पंजाब विनर (भिवंडी), राजेंद्र स्पोर्टस् (सांताक्रुझ), सोनाली शिवीर (कोलकाता), शांतीरत्न इलेव्हन (पुणे), स्टार सीसी (दांडी, पालघर), तिरुपती सावर्डे (चिपळूण), ट्रायडंट उमर इलेव्हन (नवी मुंबई), यू एस इलेव्हन (मुंबई), वैष्णवी कोलाड (रायगड), विक्रोळीयन्स क्रिकेट क्लब (विक्रोळी), यश बिस्या लायन्स (छत्तीसगढ), ब्रह्मा शिवशक्ती पार्ले (मुंबई).

आपली प्रतिक्रिया द्या