हल्ली मी नवीन डायलॉग ऐकतेय की मी सकाळी लवकर उठतो मग उपकार करता का अशा शब्दांत अजित पवार यांचे नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला. तसेच आमदार मामा भरणे यांनी तालुक्यात 5 हजार कोटी रुपयांची कामं केल्याचा दावा केला होता. त्याचाही सुळे यांनी समाचार घेतला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की काही लोक बोलतात की मी सकाळी लवकर उठलो. मग काय उपकार केले का ? लोकांच्या कामासाठीच तुम्ही आमदार, खासदार, मंत्री झालात. लवकर उठले तर काय हा आमचा प्रॉब्लेम आहे का तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे. त्यांना सकाळी लवकर उठून चहा करावा लागतो. सकाळी तर दुधवाला पण उठतो. काही लोक म्हणतात की माझं एवढं वय झालं तरी मी जनतेसाठी काम करतोय. पवारसाहेबांचं कोणी वय काढलं की ते आक्षेप घेतात. पवार साहेब केव्हाही भाषण करतात तेव्हा ते मी किती काम करतो हे सांगत नाहीत असेही सुळे म्हणाले.
एका कोटीत किती शुन्य
इंदापूरचे आमदार दत्तामामा भरणे यांनी दावा केला होता की तालुक्यात आपण पाच हजार कोटी रुपयांची काम केली. तेव्हा सुळे म्हणाल्या की याबाबत मी माहिती मागवली आहे. पण पाच हजार कोटी रुपये झाले काय? एका कोटीत किती शुन्य असतात हे मला माहित नाही. सत्ता येते सत्ता जाते पण तुम्ही लोकांचा विचार केला पाहिजे असेही सुळे म्हणाल्या.