पैसा-सत्ता येते-जाते; पण टिकतात फक्त नाती. पण काहींना नाती कळली नाहीत. लोकसभा निकालानंतर बहिणी लाडक्या झाल्या. पंधराशे रुपयांनी नाती निर्माण होत नाहीत. पण, या नात्यावरूनदेखील महायुतीत श्रेयवाद होतोय, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
तासगाव तालुक्यातील सावळज येथील स्वर्गीय चंद्रकांत पाटील यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण खासदार सुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार विशाल पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार सुमनताई पाटील, युवानेते रोहित पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, अनिता सगरे आदी उपस्थित होते.
खासदार सुळे म्हणाल्या, चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या कार्यकर्त्यामुळेच आर. आर. पाटील यांच्यासारख्या नेत्यांचे हात बळकट झाले. राज्यात नवीन चेहरा म्हणून रोहितकडे आपण पाहतोय. नेतृत्व हे संघर्षातूनच निर्माण होते. एक वर्षापूर्वी पक्ष नेला आणि चिन्हही नेले. आम्हाला चिन्ह मिळेल याचीही खात्री नव्हती; पण पांडुरंगाने ‘तुतारी’ हे चिन्ह आमच्या पक्षाला दिले. आता हे तुतारी चिन्ह वाडीवस्तीवर पोहचले आहे.
आज आम्ही चिन्ह नाही, नावावासाठी लढतोय. हा देश अदृश्य शक्तींच्या मनमानीवर चालत नाही, संविधानावर चालतो. राज्यातील 31 खासदार हे दडपशाहीला विरोध करून आलेत. खाण्या-पिण्यावरून काय नसते, असे आरएसएसचे मोहन भागवत म्हणतात. मला वाटले यांचे विचार आपल्यासारखे होत आहेत. कारण मला तर खान्यावरून जास्त ट्रोलिंग होते, अशी टीका खासदार सुळे यांनी केली.
यावेळी बाजार समितीचे सभापती युवराज पाटील, रवि पाटील, तालुकाध्यक्ष विश्वास पाटील, युवक नेते दीपक ऊनऊने यांसह चंद्रकांत बापू यांचे कुटुंबीय उपस्थित होते. प्रारंभी माजी जिल्हा परिषद सदस्य सागर पाटील यांनी प्रास्ताविक केले. ताजुद्दीन तांबोळी यांनी आभार मानले.