
देशात निर्माण झालेली एलपीजी गॅसची टंचाई आणि वाढत्या किमतींच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केंद्र सरकारला धारेवर धरले. सध्या जग मोठ्या संकटातून जात असून त्याचे परिणाम हिंदुस्थानवरही होत आहेत, अशा परिस्थितीत सरकारने तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलावून यावर तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली.
सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणात मुंबईसह देशभरातील गॅस टंचाईवर चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, केवळ गॅसच्या किमतीच वाढल्या नाहीत, तर सिलिंडर मिळण्यासाठीचा वेटिंग पिरियड देखील मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि गृहिणींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या टंचाईचा फटका केवळ घरांनाच नाही, तर रेस्टॉरंट्स, मंदिरे आणि लघु उद्योगांनाही बसत आहे. या गंभीर विषयावर सरकारने संसदेत किमान एक अधिकृत निवेदन देणे आवश्यक होते. मात्र सरकारकडून अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका मांडण्यात आलेली नाही, अशी टीका त्यांनी केली.
विरोधी पक्षाच्या भूमिकेबद्दल बोलताना सुळे यांनी स्पष्ट केले की, ऑपरेशन सिंदूर सारख्या संकटकाळात विरोधक नेहमीच सरकारसोबत खंबीरपणे उभे राहिले आहेत. मात्र सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सरकारने चर्चा करणे गरजेचे आहे.
























































