सुरत – हैद्राबाद महामार्गाचे काम शिवसेनेसह शेतकर्‍यांनी पाडले बंद

66

सामना प्रतिनिधी । नगर

सुरत-हैद्राबाद या महामार्गाचे काम सुरु झाले असताना नगर तालुक्यातील शेतकर्‍यांनी याला विरोध केला असून शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेद्र भगत यांच्यासह शेतकर्‍यांनी हे काम बंद पाडले. शेतकर्‍यांचे नुकसान सहन करणार नाही. यापुढे तिव्र स्वरुपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला. सध्या राज्यामध्ये विविध प्रकारच्या महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. अनेक ठिकाणी शेतकर्‍यांच्या बागायत जमीनी तसेच त्यांची घरे उध्दस्त होणार असल्याने आता अनेक ठिकाणी याला विरोध सुरु झाला आहे. महत्त्वाकांक्षी असलेल्या समृध्दी महामार्गालासुध्दा याच जिल्हयातून विरोध झाला होता.

सध्या नव्याने सुरत – हैदराबाद या महामार्गाचे काम हैद्राबाद येथील आर.बी.असोसीएशन हैद्राबाद या कंपनीनी काम हाती घेतले आहे. सदरचा महामार्ग हा कापुरवाडी, पिंपळगाव उजैंनी, पोखर्डी, शंडी, पिंपळगाव माळवी, डोंगरगन, वांबोरी, राहुरी असा नेण्यात येणार आहे.

आज नगर तालुक्यातील कापुरवाडी येथे या कंपनीच्या अधिकार्‍यांनी येवून सर्व्हे सुरु केला होता. सदरची बाब ही संबंधीत शेतकर्‍यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याची विचारणा केली असता त्यांना सुरूवातीला उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली. मग तुम्ही येथे काय करता याची विचारणा शेतकर्‍यांनी केली. मात्र, ही बाब लक्षात आल्यानंतर तात्काळ शेतकर्‍यांनी विरोध करण्यास सुरवात केली व दुसरीकडे मशीन उभारुन या ठिकाणी मोजमाप व बोअरचे काम हाती घेण्याची तयारी संबंधीत कंपनीने सुरु केली होती. शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र भागत यांनी संबंधीत अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर या रस्त्यासाठी कामाला सुरवात केली असल्याचे निदर्शनास आले.

यावेळी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आमच्या येथे बागायत जमीनी आहेत. जर या ठिकाणी महामार्ग झाला तर आम्ही भूमीहीन होणार आहोत. या ठिकाणी विहीरी आहेत. यालाही मोठ्या प्रमाणात पाणी आहे. तसेच काही जणांची घरेसुध्दा या ठिकाणी बांधण्यात आलेली आहेत. या सर्व बाबींचा विचान न करता निर्णय घेण्यात आला आहे. या अगोदर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेवून त्यांनाही याची कल्पना देण्यात आली होती. मात्र आम्ही आता आमच्या जमीनी देणार नाही, अशी भूमीका शेतकर्‍यांनी घेवून हे काम बंद पाडले.

दरम्यान, या संदर्भात शिवसेनेचे तालुकाप्रमुख भगत यांनी सर्वच रस्ते गुजरातला जोडण्याचे काम सध्या मोठ्या प्रमाणात सुरु आहे. तर दुसरीकडे मात्र, गोरगरीब शेतकर्‍यांच्या जमीनी हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यामधून शेकडो शेतकर्‍यांचे नुकसान होणार आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हे काम होवू देणार नाही, असे भगत यांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या