संतापजनक! वैद्यकीय तपासणीसाठी 100 महिलांना केलं विवस्त्र

2375

गुजरात येथील भूजमध्ये विद्यार्थिनींची मासिक पाळी तपासण्यासाठी त्यांना विवस्त्र करण्याचा संतापजनक प्रकार घडला होता. आता त्याच गुजरातच्या सूरतमध्ये 100 महिला कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणीसाठी विवस्त्र केल्याची घटना घडली आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सूरत महापालिकेच्या एका रुग्णालयात हा संतापजनक प्रकार घडला आहे. या रुग्णालयातील ट्रेनी कर्मचारी पदावर काम करणाऱ्या 100 महिलांना अनिवार्य असणाऱ्या तंदुरुस्तीच्या तपासणीसाठी विवस्त्र करण्यात आलं. हा प्रकार सूरत येथील नगर आयुर्विज्ञान आणि अनुसंधान संस्थान या संस्थेत घडला आहे. या कर्मचाऱ्यांना 10-10 च्या गटाने उभं करून विवस्त्र होण्यास सांगितलं गेलं आणि या दरम्यान त्यांच्या खासगीपणाच्या अधिकारांबाबत कोणतीही काळजी घेण्यात आली नव्हती, असा आरोप महिलांनी केला आहे.

तसंच, या महिला ज्या खोलीत होत्या, त्याचा दरवाजाही बंद करण्यात आला नव्हता. त्यानंतर त्यांच्या तपासणीवेळी वादग्रस्त असलेली फिंगर टेस्ट करण्यात आली आणि त्यावेळी त्यांना अत्यंत खासगी प्रश्न विचारण्यात आले, ज्यांचा त्यांच्या कामाशी काहीही संबंध नव्हता. काही अविवाहित महिलांना त्या यापूर्वी कधी गर्भवती झाल्या का, असा प्रश्न विचारण्यात आला. या महिलांपैकी काहींनी तपासणी करणाऱ्या महिला डॉक्टरांनी अतिशय वाईट वागणूक दिल्याचा आरोपही केला आहे.

या प्रकरणी रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागाचे प्रमुख अश्विन वछानी यांनी रुग्णालयाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये या कर्मचाऱ्यांची शारीरिक तपासणी अनिवार्य असल्याचं म्हटलं आहे. कोणत्याही महिला कर्मचाऱ्याला कुठल्याही प्रकारचा आजार आहे किंवा नाही, याची पडताळणी करणं गरजेचं असतं, असं स्पष्टीकरण वछानी यांनी दिलं आहे. मात्र, अशाच प्रकारे पुरुष कर्मचाऱ्यांचीही तपासणी केली जाते किंवा नाही, याबाबत माहिती नसल्याचंही वछानी यांनी स्पष्ट केलं आहे. या प्रकारामुळे सर्वत्र संतापाचं वातावरण असून रुग्णालय कर्मचारी संघटनेने याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या