जिद्दी रंगकर्मी

> संजय कुळकर्णी

सुरेश गोसावी यांच्या एकांकिकांचे विषय भन्नाट असायचे. जास्त करून ‘अब्सर्ड प्ले’ म्हणून आम्ही त्याची गणती करायचो. त्यांच्या एकांकिकांची नावं ही जरा हटकेच असायची. त्यामुळे कुतूहल निर्माण व्हायचं.

शिवाजी मंदिर नाटय़गृहात शिरायच्या आधी प्रवेशद्वाराजवळील नाटकांच्या बोर्डाकडे नजर जातेच. ते वाचताना एका बोर्डावर नजर खिळली. ‘सुरेश गोसावी यांच्या एकांकिकांचा महोत्सव’ 27 मार्चला शिवाजी मंदिरात आयोजित केलेला आहे.

हौशी वर्तुळात सुरेश गोसावी यांना मानाचं स्थान आहे. अनेक वर्षांपासून त्यांची भेट झाली नाही. ते सध्या काय करतायत, कुठे असतात आणि लेखन करतायत की नाही, याबद्दलचे अनेक प्रश्न माझ्या मनात आले. एवढं कळलं होतं की, काही वर्षांपूर्वी त्यांना पॅरॅलिसीसचा अटॅक आला होता. कालांतराने त्यांनी त्यावर मात केली. सोमवारी महोत्सवात त्यांची भेट होईल ही आशा धरून नाटकाचा प्रयोग पाहू लागलो. प्रयोग पाहताना त्यांचाच विचार येत होता. त्यांना नाटक करायचं होतं, पण त्यांचा पेहराव आणि चेहरेपट्टीमुळे त्यांना नाटकात कुणीही भूमिका देत नव्हतं. लोअर परळच्या 10 बाय 10 च्या खोलीत त्यांचं बालपण गेलं.

लालबाग – परळ हे त्यावेळचे सांस्कृतिक चळवळीचे ठिकाण. रात्र रात्र भजन, भारूड, कीर्तन चालायचे. नाटकांच्या नाही तर छोटय़ा छोटय़ा नाटुकल्याच्या तालमी होत असत. त्या लक्षपूर्वक सुरेश पाहायचे. तरुण वयात त्यांच्यावर नाटकाचे संस्कार झाले. ‘चला आपणसुद्धा एकांकिका लिहूया’ असं मनाशी ठरवून त्यांनी लिहिली. स्पर्धेत भाग घेतला. त्यांना लेखनाचे पारितोषिक मिळालं. पुढे त्यांना स्पर्धेत भाग घेण्याची ऊर्मी त्या पारितोषिकाने दिली. त्यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या एकांकिका स्पर्धेत दिसू लागल्या. ज्या ज्या स्पर्धेत मी परीक्षक असायचो त्या स्पर्धेत त्यांची हमखास एकांकिका असायची. नाटकाचे सर्व अंग ते एकलव्यासारखे शिकले. स्वतःच्या जिवावर त्यांना पालिकेत नोकरी मिळाली. मग काय, त्याच्या नाटय़ कारकिर्दीला आणखीनच बळ मिळालं. त्यांच्या स्पर्धा होत असताना राज्य स्पर्धेत ते भाग घेऊ लागले. स्पर्धेत त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं. खाचखळगे पार करून त्यांची नाटकं स्पर्धेत गाजू लागली. कामगार कल्याण केंद्राच्या नाटय़ स्पर्धेत ते हिरीरीने भाग घ्यायचे. खर्चाचा ताळमेळ ते कसा जुळवायचे हे मला अजून तरी समजलेले नाही. पारितोषिकं मिळाल्याने त्यांचा हुरूप वाढला.

आज हे लिहीत असताना त्यांचा नंबर मिळविला. फोनवर बोललो. बोलताना ते भावुक झाले. त्यांनी लिहिलेल्या संहिता या घडीला त्यांच्याकडे नसतीलही, पण त्या नाटकाची आणि एकांकिकांची आठवण रंगकर्मींना आहे. त्यामुळे 27 मार्चपासून त्यांच्या गाजलेल्या एकांकिका महोत्सवास त्यांच्या हितचिंतकांची आणि नाटय़प्रेमींची गर्दी नक्कीच होणार यात शंकाच नाही. फोनवरील त्यांचे शब्द अजून आठवतात. ते म्हणाले, ‘विषय क्लिक झाला की असलेली गाडी, बस सोडायचो. ठिकाण कुठलंही असो, लिहून पूर्ण होईपर्यंत जागा सोडायचो नाही. अवेळी जेवणामुळे प्रकृतीवर अनिष्ट परिणाम झाले. पण त्यावेळी लिहिलं नसलं तर तितकं अनवट लिहून नसतं झालं.’ आज ते डाव्या हातानं टॅबवर काही ना काही लिहीत असतात. महाराष्ट्र शासनाने या लेखकास आर्थिक मदत करायला हवी. अजूनसुद्धा त्यांना वाटते की, राज्य स्पर्धेसाठी चांगलं नाटक लिहावं. सुरेश, तुम्हाला हॅट्स ऑफ!!