बबनराव लोणीकरांमुळे माझ्या जीवाला धोका

327

सामना ऑनलाईन | जालना

माझ्या व माझ्या कुटुंबियांना पालकमंत्री आणि भाजपचे नेते बबनराव लोणीकर यांच्यापासून धोका आहे. आमचे काही बरेवाईट झाल्यास त्याला लोणीकरच जबाबदार असतील, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया यांनी आज केला. पाणीपुरवठामंत्री असलेल्या लोणीकरांनी सत्तेचा वापर करून नातेवाईकांच्या नावावर कोट्यावधींची संपत्ती जमवल्याचा गौप्यस्फोटही जेथलिया यांनी केला.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार सुरेश जेथलिया यांनी रविवारी पत्रकार परिषदेत घेऊन राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्यावर धक्कादायक आरोप केले. आपली पत्नी परतूर नगर परिषदेची अध्यक्षा आहे. पण आपल्याला राजकीय आव्हान असू नये म्हणून लोणीकर सत्तेचा दुरूपयोग करून सूड उगवत आहेत. त्यामुळे लोणीकरांनी चौकशीचा ससेमिरा आपल्या कुटुंबामागे लावला आहे, असा आरोप जेथलिया यांनी केला. माझ्या कुटुंबाला टार्गेट करण्यासाठी पालकमंत्र्यांनी २ वेळा नगरपालिकेचे लेखा परीक्षण केले. तसेच खुनाच्या गुन्ह्यात बळजबरीने चौकश्या केल्या. आमच्यावर आरोप असलेल्या प्रकरणात न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला आहे. पण लोणीकर प्रशासनावर दबाव आणून आम्हाला त्रास देत आहे. लोणीकर यांच्याकडून आपल्याला त्रास दिला जात आहे. मला आणि माझ्या कुटुंबियांच्या जीवांना त्यांच्यापासून धोका आहे. त्यामुळे आमच्या जीवितास काही झाले तर त्यास लोणीकरांना जबाबदार धरावे, असा आरोप जेथलिया यांनी केला आहे.

पालकमंत्र्यांनी जमवली कोट्यावधींची माया

पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सत्ता काळात अधिकाराचा दुरूपयोग केला आहे. त्यांनी गेल्या तीन वर्षांच्या काळात कोट्यावधी रूपयांची माया जमा केली आहे. लोणीकरांनी ही संपत्ती आपल्या नातेवाईकांच्या नावावर जमा केली असल्याचा खळबळ उडवून देणारा दावा केला आहे.

तक्रारीवरून चौकशी केली : लोणीकर

माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी केलेल्या गैरकारभाराविषयी परतूर येथील डॉ. पोरवाल आणि इतरांनी तक्रारी केलेल्या आहेत. त्या तक्रारी पालकमंत्री म्हणून प्रशासनाकडे पाठवल्या. जेथलिया यांनी माझ्यावर केलेले आरोप राजकीय द्वेषापोटी आहेत, असे बबनराव लोणीकर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या