रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले ‘जय कर्नाटक’!

सामना ऑनलाईन । बेळगाव

महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी जाहीर कार्यक्रमात ‘जय कर्नाटक’ अशी घोषणा देत अस्मितेसाठी लढणाऱ्या सीमाभागातील मराठी बांधवांच्या जखमांवर मीठ चोळले. आपल्या न्याय्य मागणीसाठी लढा देत असलेल्या सीमाभागातील मराठी बांधवांना कानडी पोलीस अनेकदा बेदम चोप देतात. मराठी तरुणांवर गंभीर आरोप ठेवून खटले टाकले जातात. त्यांना तुरुंगात डांबले जाते. हे सगळे माहीत असूनही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू बेळगावमधील एका उद्घाटनाच्या कार्यक्रमात मुंबईतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले. या कार्यक्रमात बोलताना रेल्वेमंत्र्यांनी ‘जय कर्नाटक’ अशी घोषणा दिली.

बेळगाव शहरात रविवारी रेल्वेच्या पहिल्या उड्डाणपुलाचे उद्घाटन पार पडले. कपिलेश्वर रोड ते शनि मंदिर पर्यंत रेल्वेने १९ कोटी खर्चून उड्डाणपूल बांधला आहे. या पुलाचे उद्घाटन करण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू मुंबईतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले. उद्घाटनप्रसंगी केलेल्या भाषणाच्या शेवटी रेल्वेमंत्र्यांनी ‘जय कर्नाटक’ अशी घोषणा दिली.

कर्नाटकमध्ये उपस्थित नसताना महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या सुरेश प्रभू यांनी मुंबईतून केलेल्या भाषणात ‘जय कर्नाटक’ अशी घोषणा दिली. रेल्वेमंत्र्यांच्या या कृतीमुळे अस्मितेसाठी ६० वर्षांपासून लढणारे मराठी बांधव दुखावले आहेत.