मला पुन्हा बोलावू नकोस! धोनीने रैनाला धमकावत, अख्खं किट आणून मैदानात आपटलं होतं

माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि माजी क्रिकेटपटू सुरेश रैना हे एकमेकांचे खास दोस्त आहेत. दोघांमधील मैत्री इतकी घट्ट आहे की ज्या दिवशी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती त्याच दिवशी रैनानेही त्याच्या निवृत्तीची घोषणा केली होती. हे दोघेही 15 ऑगस्टला निवृत्त झाले होते. या दोघांची चांगली मैत्री असली तरी एकदा धोनी रैनावर जाम वैतागला होता. रैनाने हा किस्सा गौरव कपूर याच्या 22 Yarns Podcast या कार्यक्रमात सांगितला आहे.

हिंदुस्थानी संघ आयर्लंडच्या 2018 साली दौऱ्यावर गेला होता आणि दोन्ही संघात T20 सामना खेळवण्यात येत होता. हा किस्सा याच सामन्यादरम्यान घडला होता असं रैनाने सांगितलं आहे. धोनीचा संघात समावेश केला असला तरी त्याला या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली होती. साहजिकच आहे धोनीचा अंतिम 11 खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला नव्हता. दुसऱ्या T20 सामन्यात रैना मैदानात फलंदाजीसाठी उतरला होता. यावेळी धोनीने मैदानातील क्रिकेटपटूंसाठी पाणी नेऊन देण्याची भूमिका बजावली होती.

रैनाला धोनीच्या खोड्या काढण्याची सवय होती. जी धोनालाही चांगल्या पद्धतीने माहिती होती. सामना खेळत असताना मी सतत ग्लोव्ह आणि बॅट बदलत होतो, त्यासाठी मी धोनीला पळवत होतो असं त्याला वाटत होतो असं रैनाने म्हटलंय. धोनी यामुळे वैतागला होता. एकवेळ अशी आली जेव्हा धोनीने रैनाचं अख्ख किट उचललं आणि मैदानात आणून आपटलं. यावेळी धोनीने रैनाला म्हटलं ‘काय हवं ते एकदाच घे, मला परत बोलावू नकोस. इथे खूप थंडी आहे आणि मी पुन्हा येणार नाही.’ असं धमकावल्यानंतरही गप्प बसेल तो रैना कसला. त्याने धोनीला सांगितलं ‘एक काम कर बॅटची ग्रीपही घेऊन ये.’ यावर धोनी म्हणाला की ‘बोहोत बडावाला है तू, तू रुक जा.. पानी पी, मैं लेके आता हूं’ हा किस्सा आठवताना रैना खूप हसला आणि म्हणाला की मी त्या दिवशी पूर्ण बदला घेतला होता.

आपली प्रतिक्रिया द्या