सुरेश रैनाच्या काका आणि चुलत भावांचे मारेकरी सापडले, ‘या’ साठी केला होता संपूर्ण कुटुंबावर प्राणघातक हल्ला

2035

दुबई येथे IPL साठी गेलेला क्रिकेटपटू सुरेश रैना हा तडकाफडकी हिंदुस्थानात परतला होता. तो अचानक परत येण्यामागचं कारण अनेकांना कळालं नव्हतं. त्याच्या परत येण्यावरून बरेच तर्क वितर्क लढवले जात होते. सुरेश रैना याने हिंदुस्थानात परतण्याबाबतचे कारण सांगितले होते. त्याच्या काकाच्या घरावर अज्ञातांनी हल्ला केला होता ज्यात काकांचा जागीच मृत्यू झाला होता तर दोन चुलत भावांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. रैनाची काकू ही रुग्णालयात असून तिची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. रैनाचे काका आणि त्यांचं कुटुंब हे पंजाबमध्ये राहात होतं. संपूर्ण कुटुंबाला हादरवून टाकणारी ही घटना असल्याने आपण मायदेशी परतल्याचे रैना याने सांगितले होते.

पंजाब पोलिसांनी या घटनेनंतर विशेष तपास पथक नेमून तपासाला सुरुवात केली होती. पोलीस महानिरीक्षकांच्या नेतृत्वाखाली हे तपास पथक तयार करण्यात आलं होतं.पोलिसांनी तपासादरम्यान 100 संशयितांची चौकशी केली होती. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी बुधवारी या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला असल्याचे जाहीर केले आहे. पोलिसांनी या प्रकरणातील 3 आरोपींना अटक केली असून 11 आरोपी अद्याप फरार आहेत. आरोपी हे अट्टल गुन्हेगार असून तो विविध राज्यात घरफोडी करत असल्याचं पोलिसांना कळालं आहे.

मंगळवारी म्हणजेच 15 सप्टेंबरला पोलिसांना या हत्याकांडातील 3 आरोपी हे एका रस्त्यावर दिसल्याचे कळाले होते. हे आरोपी पठाणकोट रेल्वे स्थानकाजवळील झोपड्यांमध्ये राहात असल्याचेही पोलिसांना कळाले होते. या माहितीनंतर पोलिसांनी छापेमारी करत या तीनही आरोपींना अटक केली. त्यांच्या ताब्यातून AK अशी अक्षेरे असलेली अंगठी, सोन साखळी, 1530 रुपयांची रोकड आणि दोन दांडके हस्तगत केले. हे दांडके हल्ल्यात वापरले असावेत असा पोलिसांना संशय आहे. सावन उर्फ मॅचिंग, मुहोब्बत आणि शाहरूख खान अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे तिघेही मूळचे राजस्थानातील छिरावा आणि पिलानीचे रहिवासी आहेत.

अटकेत असलेले आरोपींची एक मोठी टोळी आहे. रैनाचे काका अशोक कुमार यांच्या घरावर ज्या पद्धतीने हल्ला करण्यात आला तशाच पद्धतीचे हल्ले करत या टोळीने उत्तर प्रदेश, जम्मू-कश्मीर, पंजाबमध्ये लूटमार केल्याचे पोलिसांना कळाले आहे. ज्या रात्री या दरोडेखोरांनी अशोक कुमार यांच्या घरावर हल्ला केला होता, त्या रात्री नेमकं काय झालं होतं हे देखील या आरोपींकडून कळालं आहे.

19 ऑगस्ट रोजी अशोक कुमार यांच्या घरावर हल्ला करण्यापूर्वी या टोळीचे त्या रात्री दोन प्रयत्न फसले होतं. त्यानंतर त्यांच्या ठरलेल्या पद्धतीनुसार या दरोडेखोरांनी 2-2 लोकांचे गट करून वेगवेगळ्या रस्त्यांनी अशोक कुमार यांचे घर गाठले. दरोडेखोर शिडीच्या सहाय्याने त्यांच्या गच्चीवर गेले. गच्चीवर तिघेजण झोपले होते. या तिघांच्या डोक्ात वार करून तिघांना दरोडेखोरांनी ठार मारले. त्यानंतर घरात जात असताना आडवा येईल त्याला जीवघेणी मारहाण करत हे आरोपी हाताला लागेल तो ऐवज घेऊन फरार झाले होते. दरोडा टाकल्यानंतर ते पुन्हा 2-3 लोकांच्या गटात विभागले आणि पुन्हा वेगवेगळ्या मार्गांनी रेल्वे स्थानकावर पोहोचले. तिथे त्यांनी मालाची वाटणी केली आणि सगळे जण पळून गेले.

आपली प्रतिक्रिया द्या