स्वत:ला रामाचे भक्त म्हणता, मग जागेवर अधिकार कसा सांगता? सुप्रीम कोर्टाने निर्मोही आखाड्याला झापले

887
supreme-court-of-india

अयोध्येतील रामजन्मभूमीवर मालकी हक्क सांगणाऱया निर्मोही आखाडय़ाला शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच झापले. स्वतःला रामलल्लाचे भक्त म्हणता, मग अयोध्येतील जागेवर अधिकार कसा काय सांगता? आपण भक्त म्हणत असाल तर तुमचा संपत्तीवर मालकी हक्क उरतच नाही. आपण बोलता एक आणि लिहून देता दुसरेच अशा शब्दांत न्यायालयाने निर्मोही आखाडय़ाचे वकील सुशील जैन यांचे कान उपटले.

अयोध्येप्रकरणी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठापुढे शुक्रवारी अकराव्या दिवशी सुनावणी झाली. यावेळी निर्मोही आखाडय़ाच्या वतीने ऍड. सुशील जैन यांनी बाजू मांडली. लेखी स्वरूपात मांडलेली बाजू आणि तोंडी युक्तिवाद यात फरक दिसून येताच न्यायालयाने ऍड. जैन यांना फैलावर घेतले. जर तुम्ही भगवान रामलल्लाचे भक्त असल्याचा दावा करत असाल तर वादग्रस्त जागेवरील मालकी हक्क गमवाल. यामुळे तुमचा संपत्तीवरील एकतृतीयांश दावा सरळ सरळ बाद होतो. तसेच आपली नेमकी भूमिका काय आहे ते सांगा. आपण बोलताय एक आणि लिहून देताय दुसरेच. तुम्ही नेमकी बाजू स्पष्ट करा, असे न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी ऍड. जैन यांना बजावले.

मालकी हक्क नकोय, पूजेचा अधिकार हवा!
आपण जन्मभूमीला देवता आणि पक्षकार मानता की नाही, असा सवाल न्यायाधीशांनी निर्मोही आखाडय़ाला केला. त्यावर ऍड. जैन यांनी रामजन्मभूमीला पक्षकार मानण्यास आम्ही नकार मुळीच देत नसल्याचे सांगितले. आम्ही मालकी हक्काचा दावा करत नाही, आम्ही केवळ पूजेचा अधिकार आणि ताबा मागतोय अशी भूमिका ऍड. जैन यांनी मांडली. भक्त असल्याच्या नात्याने माझा संपत्तीवर ताबा राहिला आहे. भक्त असल्यामुळेच माझ्या अधिकारावर कोणी आक्षेप घेतलेला नाही, असेही म्हणणे निर्मोही आखाडय़ाच्या वतीने मांडण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या