100 रुपयांची लाच मागणारा अभिलेखापाल जाळ्यात

111

सामना प्रतिनिधी । जालना

जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथील भुमिअभिलेख कार्यालयातील अभिलेखापाल आकाश साळवे यांनी 100 रुपयांची लाचेची मागणी केल्यावरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालनाच्या पथकाने पकडले आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांना बँकेकडून पिक कर्ज घेण्यासाठी शेतजमीनीची नकलची आवश्यकता होती म्हणून तक्रारदार यांनी काही दिवसांपूर्वी भुमी अभिलेख कार्यालय घनसावंगी येथे जावून सर्वे न. 79 शेतजमीनीची नक्कल मिळण्या करिता अर्ज केला होता. त्यानंतर 3 जुलै रोजी तक्रारदार हे भुमी अभिलेख कार्यालय घनसावंगी येथे जावून तेथील नक्कल देणारे आकाश साळवे यांना भेटून नक्कल देण्याची विनंती केली असता सदर शेतीची नक्कल देण्यासाठी अभिलेखापाल आकाश साळवे यांनी तक्रारदार यांच्याकडे 250 रुपयांची लाचेची मागणी करुन 250 रुपये दिल्याशिवाय नक्कल मिळणार नाही, असे सांगितले. त्यावर तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

या तक्रारीवरुन 3 जुलै रोजी अभिलेखापाल आकाश साळवे यांच्या लाचेच्या मागणीची पडताळणी भुमिअभिलेख कार्यालय, घनसावंगगी येथे जावून केली असता लाच मागणी पडताळणी दरम्यान पंचासमक्ष आकाश साळवे यांनी तक्रारदार यांच्याकडे शेत जमीनीची नक्कल देण्यासाठी तडजोडअंती 100 रुपये लाचेची मागणी करुन 100 रुपये लाचेची रक्कम स्विकारणार असून लाचेची रक्कम भुमिअभिलेख कार्यालय, घनसावंगी येथे आणून देण्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन वरील आरोपी विरुध्द घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही पोलीस अधिक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, पोलीस उपअधिक्षक रवींद्र डी. निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व्ही.एल. चव्हाण, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे जालना कार्यालयाचे कर्मचारी यांनी पार पाडली.

आपली प्रतिक्रिया द्या