सूर्यकांत महाडिक यांना भारतीय कामगार सेनेच्या हॉटेल ग्रॅण्ड हयात युनिटकडून श्रद्धांजली

लढवय्ये कामगार नेते व भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना उपनेते सूर्यकांत महाडिक यांच्या निधनामुळे कामगारवर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांची उणीव कोणीही भरून काढू शकत नाही, अशी भावना भारतीय कामगार सेनेच्या हॉटेल ग्रँड हयात युनिटकडून आयोजित केलेल्या श्रद्धांजली सभेत मान्यवरांनी व्यक्त केली.

भारतीय कामगार सेनेच्या हॉटेल ग्रँड हयात युनिटचे चिटणीस मनोज धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आज ग्रँड हयात येथे सूर्यकांत महाडिक यांची शोकसभा आयोजित करण्यात आली होती. आज मी जो काही आहे, ते केवळ सूर्यकांत महाडिक यांच्यामुळेच आहे, अशी भावना मनोज धुमाळ यांनी व्यक्त केली. यावेळी युनिटचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी महाडिक यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी व्यवस्थापनाच्या वतीने हॉटेलचे जनरल मॅनेजर क्रिस फ्रँजन, मॅनेजर सोनाली झगाडे, सुलभ सुरी, जूनिपर हॉटेलच्या वतीने मनीष अडुकिया यांनीही महाडिक यांच्या आठवणी सांगितल्या. या कार्यक्रमासाठी अभय प्रभू, सिद्धेश पांढरकमे, संदेश परब, संजय पतये, संजय जाधव, हीना शेख, पुश गवस यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

भारतीय कामगार सेनेच्या वतीने आज चेंबूरमध्ये शोकसभा

सहा दशपं कष्टकरी कामगार वर्गासाठी अव्याहतपणे झटलेले आणि गेली 17 वर्षे भारतीय कामगार सेनेची धुरा यशस्वीपणे संभाळणारे शिवसेना उपनेते सूर्यकांत महाडिक यांच्या अकाली निधनामुळे कामगार चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना श्रद्धांजली वाहन्यासाठी भारतीय कामगार सेनेच्या वतीने उद्या मंगळवारी चेंबूर येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. सत्यभामा आचार्य सभागृह, डब्ल्यू. टी. पाटील मार्ग, शरद टॉकिज समोर, चेंबूर येथे सायंकाळी 5 वाजता ही शोकसभा होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या