ठरलं! पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंडला जाणार

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली इंग्लंड दौऱ्यावर गेलेला टीम इंडियाचा संघ दुखापतीमुळे त्रस्त आहे. पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू होण्यापूर्वी शुभमन गिल, आवेश खान आणि वाशिंग्टन सुंदर या तीन खेळाडूंना दुखापत झाली असून तिघेही या मालिकेला मुकणार आहेत. या खेळाडूंना आता पर्यायी खेळाडू शोधण्यात आले असून श्रीलंका दौऱ्यावर असणाऱ्या पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादवची या मालिकेसाठी वर्णी लागली आहे.

शुभमन गिल याला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान दुखापत झाली होती. तर आवेश खान आणि वाशिंग्टन सुंदर या दोघांना पहिल्या सराव सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. तीन खेळाडूंना दुखापत झाल्याने संघ व्यवस्थापनाने पर्यायी खेळाडूंची मागणी केली होती. आता ही मागणी बीसीसीआयने मान्य केल्याचे वृत्त आहे.

बीसीसीआयच्या एका वरिष्ट अधिकाऱ्याने याबाबत माहिती देताना सांगितले की, पृथ्वी शॉ आणि एक दिवसीय मालिकेत मालिकावीर पुरस्कार पटकावणारा सूर्यकुमार यादव इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. फिरकीपटू जयंत पाटीलही इंग्लंड दौऱ्यावर जाणार होता, मात्र क्वारंटाईन नियमांमध्ये बदल झाल्याने त्याला पाठवण्याचा निर्णय रद्द झाला आहे. फक्त पृथ्वी आणि सूर्यकुमार कोलंबोतून ‘बायो बबल’ ते ‘बायो बबल’ असा प्रवास करतील.

तसेच दोन्ही खेळाडू श्रीलंकेविरुद्ध सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेदरम्यान किंवा मालिकेनंतर इंग्लंडसाठी रवाना होतील. परंतु याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. आगामी दोन-तीन दिवसात याबाबत निर्णय होईल, असेही बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

4 ऑगस्टपासून मालिकेला सुरुवात

हिंदुस्थान आणि इंग्लंडमधील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे श्रीलंकेतील टी-20 मालिका संपल्यानंतर पृथ्वी आणि सूर्यकुमार इंग्लंडला रवाना झाल्यास त्यांना पहिला कसोटी सामना खेळता येणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या