‘चंदा मामा दूर के’ चित्रपटासाठी सुशांत सिंग राजपूतची ‘नासा’वारी

35

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आगामी चित्रपट ‘चंदा मामा दूर के’ मध्ये अंतराळवीराची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी त्याला थेट ‘नासा’मध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नासामध्ये प्रशिक्षण घेऊन चित्रपटात भूमिका करणारा सुशांत हा पहिलाच बॉलिवूड स्टार आहे. आपल्या या अनोख्या अनुभवाविषयी सुशांतने काही ट्वीट केले आहेत.

‘खरं तर अंतराळवीरांना अत्यंत कठीण प्रशिक्षण दिलं जातं. प्रशिक्षणादरम्यान तुमचा अनुभव, कौशल्य तसेच एकाग्रताही पणाला लागते. अशावेळी ताण घेऊन चालत नाही. इथे पास किंवा नापास अशी स्थिती नसते, तर जीवन किंवा मरणाचा प्रश्न असतो.’ असे सुशांतने ट्वीट केले आहे. त्याचप्रमाणे सुशांतने पांढऱ्या रंगाचा स्पेसशूट घातलेले फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.

‘नासा’मध्ये सुशांतला मूनवॉक, अंतराळात चालण्याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याआधीही सुशांतने नासा सेंटरला भेट दिली होती. त्यावेळी तिथे झिरो ग्रॅव्हिटीचा अनुभव त्याने घेतला होता. काही दिवसांपूर्वी सुशांत बोइंग ७३७ विमानाच्या कॉकपिटमध्ये बसला होता.

आपली प्रतिक्रिया द्या