सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण- वृत्त प्रसारणावर बंदीच्या मागणीसाठी आणखी एक याचिका

681

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी विविध टीव्ही चॅनेल्सवर चुकीच्या बातम्या प्रसारित केल्या जाऊ नयेत यासाठी वृत्त प्रसारणावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करत हायकोर्टात एका संस्थेने याचिका दाखल केली आहे. या याचिकेची दखल घेत मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे.

सुशांत सिंग राजपूत याने 14 जून रोजी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. तेव्हापासून विविध  वृत्त वाहिन्यांवर सुशांतच्या आत्महत्येविषयी विविध वृत्ते प्रसारित केली जात आहेत. शहानिशा न करताच अनेक वृत्ते ‘सनसनाटी’ म्हणूनही बिनधोक दाखविण्यात येत आहेत. याचा परिणाम सीबीआय द्वारे करण्यात येणाऱ्या तपासावर होऊ शकतो. त्यामुळे मीडिया ट्रायलवर  बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते निलेश नवलखा, महिबूब डी. शेख आणि सुभाष चंदर छबा यांनी दाखल केली होती, तर पोलिसांची बदनामी होत असल्याने निवृत्त आयपीएस पोलिस अधिकाऱ्यांनीही हायकोर्टात याचिका दाखल केली होती. सुशांतसंदर्भातील वृत्त प्रसारणावर बंदीची मागणी करत इन परस्युट ऑफ जस्टीस या संस्थेने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. काही वृत्त चॅनेल्सनी सुशांतचे मोबाईलवरील खासगी संभाषण वाहिन्यांकर दाखवले असून काही जणांना सुशांतचे मारेकरी म्हणून घोषित केले आहे. याचा परिणाम तपासावर होणार असल्याने वृत्त प्रसारणावर बंदीची मागणी घालण्यात आली आहे. या तिन्ही याचिकांवर 8 ऑक्टोबर रोजी एकत्रित सुनावणी होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या