सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणं; न्यायप्रविष्ट प्रकरणांवर मीडिया ट्रायल घ्याल तर याद राखा!

mumbai-high-court

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून मीडिया ट्रायल घेणाऱया अर्णबच्या रिपब्लिक टीव्हीसह इतर चॅनल्सना मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी चांगलेच झापले. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना पुन्हा जर मीडिया ट्रायल घ्याल तर याद राखा, तुमच्यावर न्यायालयीन अवमानाची कारवाई करू, असा इशारा मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने टीव्ही चॅनल्सना दिला. एवढेच नव्हे तर जोपर्यंत इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी नियमावली तयार केली जात नाही तोवर प्रेस काऊन्सिलची मार्गदर्शक तत्त्वे पाळा, असेही हायकोर्टाने प्रसारमाध्यमांना बजावले.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून बेजबाबदारपणे मीडिया ट्रायलद्वारे विविध वृत्त प्रसारित केली जात आहेत. त्यामुळे मीडिया ट्रायलवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करत सामाजिक कार्यकर्ते नीलेश नवलखा यांनी याचिका दाखल केली आहे तर याप्रकरणात पोलिसांची बदनामी होत असल्याने निवृत्त आयपीएस पोलीस अधिकाऱयांनी व एका संस्थेने हायकोर्टात याचिका केली आहे. या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठाने राखून ठेवलेला निकाल जाहीर केला. कोर्टाने या प्रकरणाबाबत निरीक्षण नोंदवताना रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ व इतर चॅनल्सवर ताशेरे ओढले. टीव्ही चॅनल्सनी गुन्हेगारी तपासासंबंधी चर्चा, वादविवाद घडवून आणायला नको. विशेषतŠ इलेक्ट्रॉनिक मीडियाने अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत. एखाद्या प्रकरणात कोणत्याही व्यक्तीला अपराधी किंवा निर्लज्ज असा शेरा न लावता त्याच्या चारित्र्याबाबत माध्यमांनी चर्चा घडवून आणू नये. एखाद्या प्रकरणावर मीडिया ट्रायलचा परिणाम होईल असे वृत्तांकन मीडियाने न केलेलेच बरे. एवढेच काय तर गुह्याशी संबंधित किंवा इतर प्रकरणातील महत्त्वपूर्ण साक्षीदारांची मुलाखत माध्यमांनी घेऊ नये असे निरीक्षण नोंदवत हायकोर्टाने याचिका निकाली काढली.

  • केंद्र सरकारने मीडिया ट्रायलवर वचक ठेवण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष केले.
  • मीडिया ट्रायलमुळे तपासात अडथळे, तपासावरही परिणाम.
  • चॅनेलवरील वादविवाद चर्चेमुळे न्यायालयिन प्रशासनात हस्तक्षेप झाला.
  • माध्यमांनी गुह्याच्या घटनेचे विश्लेषण करू नये.
  • आरोपींचे फोटो प्रसिद्ध करू नयेत, नाटय़ रूपांतर दाखवू नये, तपासातील संवेदनशील माहिती प्रसिद्ध करू नये.

मुंबई पोलिसांवरील टीका चुकीची

सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांवर टीका करण्यात आली, बदनामी करण्यात आली. पण टीव्ही चॅनलनी केलेली ही टीका चुकीची असल्याचे मुख्य न्यायमूर्तींनी स्पष्ट केले. पोलीस आपल्या परीने योग्य त्या दिशेने तपास करीत असल्याचे न्यायमूर्तींनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या