कॉमनवेल्थ कुस्तीमध्ये सुशील कुमार, साक्षी मलिकला सुवर्ण पदक

सामना ऑनलाईन । जोहान्सबर्ग

दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेत हिंदुस्थानच्या सुशील कुमार, साक्षी मलिकने सुवर्ण पदक पटकावले आहे. पुरुषांच्या ७४ किलो वजनी गटामध्ये झालेल्या अंतिम सामन्यात विजय मिळवत सुशील कुमारने सुवर्ण पदक जिंकले.

सुशील कुमार पाठोपाठ महिलांच्या कुस्ती स्पर्धेतूनही हिंदुस्थानी क्रीडाप्रेमींसाठी खूषखबर आली. रिओ ऑलिम्पिकधील कांस्य पदक विजेती साक्षी मलिकने महिलांच्या फ्रीस्टाइलमधील ६२ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. साक्षी हिने न्यूझीलंडच्या तायला तुआहिने फोर्ड हिचा १३-२ असा पराभव केला.

ट्विटरवर व्यक्त केला आनंद
कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेत हिंदुस्थानला सुवर्णपदक जिंकून दिल्यानंतर सुशील कुमारने ट्विटरवर आपला आनंद व्यक्त केला. ‘माझ्यासाठी हा गौरवाचा, तसेच भावूक क्षण आहे. मी आंतरराष्ट्रीय स्तरावर ३ वर्षांनंतर पुनरागमन केले आहे. सुवर्ण पदक जिंकून देणारा हा विजय मी माझे माता-पिता, गुरू सतपाल, आध्यात्मिक योगगुरू स्वामी रामदेव आणि देशाच्या प्रत्येक नागरिकांना अर्पण करतो,’ असे ट्वीट सुशीलने केले आहे.