कुस्तीपटू सुशील कुमारला राष्ट्रकुल स्पर्धेचे तिकीट

62

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानचा आघाडीचा कुस्तीपटू आणि ऑलिम्पिक रौप्य पदक विजेता सुशील कुमार २०१८मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पात्र झाला आहे. शुक्रवारी ७४ किलो वजनी गटात झालेल्या सामन्यात सुशीलने कुस्तीपटू जितेंदर कुमारचा पराभव करत राष्ट्रकुल स्पर्धेचे तिकीट मिळवले.

सुशील कुमारने २०१०मध्ये नवी दिल्ली येथे आणि २०१४मध्ये ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. त्यामुळे सुवर्ण पदकांची हॅटट्रिक साधण्यासाठी सुशील कुमार उत्सुक आहे.

याआधी खांद्याच्या दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या सुशील कुमारने दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथे झालेल्या राष्ट्रकुल कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते. या विजयानंतर ‘माझ्यासाठी हा गौरवाचा, तसेच भावूक क्षण आहे. मी आंतरराष्ट्रीय स्तरावर ३ वर्षांनंतर पुनरागमन केले आहे. सुवर्ण पदक जिंकून देणारा हा विजय मी माझे माता-पिता, गुरू सतपाल, आध्यात्मिक योगगुरू स्वामी रामदेव आणि देशाच्या प्रत्येक नागरिकाला अर्पण करतो,’ असे ट्वीट सुशील कुमारने केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या