जब कभी हम दोस्त हो जाये तो शर्मिन्दा न हो, सुषमा स्वराज यांनी ममता, प्रियंकांना सुनावले

121

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

लोकसभा निवडणूक प्रचारात सर्वच पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर कडवी आणि तिखट टीका सुरु केली आहे. पण  या धामधुमीत पश्चिम  बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पातळी सोडून केलेल्या वादग्रस्त टिकेवर केंद्रीय मंत्री आणि जेष्ठ भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी खडे बोल सुनावले आहेत.स्वराज यांनी ममता यांना “दुश्मनी जमकर करो, लेकिन ये गुंजाईश रहे, जब कभी हम दोस्त हो जाये तो शर्मिन्दा न हो” हा प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचा शेर ऐकवत ममतांच्या बेताल वक्तव्याबद्दल आपली जाहीर नाराजी ट्विटरद्वारे व्यक्त केली.

ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानपदाचा आब न राखता मंगळवारी तृणमूलच्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बेलगाम टीका केली होती. “मी मोदींसारखा खोटारडा पंतप्रधान आजवर पहिला नव्हता. ते बंगालमध्ये येऊन तृणमूलला लुटारूंचा पक्ष म्हणतात. मला त्यांना लोकशाहीची थप्पड द्यावीशी वाटते असे” वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर स्वराज यांनी ममतांना राजधर्माची आठवण करून दिली. त्या म्हणाल्या, “ममाताजी तुम्ही आज सर्व सीमा पार केल्या. तुम्ही एका राज्याच्या मुख्यमंत्री आहात. उद्या तुम्हाला मोदी पुन्हा सत्तेवर आल्यावर पंतप्रधान म्हणून त्यांच्याशीच बोलावे लागणार आहे. म्हणूनच तुम्हाला शायर बशीर यांचा लोकप्रिय शेर ऐकवतेय.   

प्रियंकांनाही संतप्त सवाल 

“प्रियंकाजी तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अहंकाराची गोष्ट सांगत दुर्योधनाची उपमा दिलीत. पण मी तुम्हाला आठवण करून देते, तुमचे बंधू राहुल गांधी यांनी युपीए सत्तेवर असताना राष्ट्रपतींच्या  वटहुकूमाची प्रत टराटरा फाडून तत्कालीन पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग  यांचा जाहीर अपमान केला होता. तेव्हा अहंकाराच्या गोष्टी विसरला होतात का?, तुम्ही आता आम्हाला अहंकाराच्या गोष्टी कसल्या शिकवता”, अशा कठोर शब्दांत सुषमा स्वराज यांनी  काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांना सुनावले.

आपली प्रतिक्रिया द्या