सीमेवर जवान शहीद होताना तुमच्याशी चर्चा काय करणार?

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

सीमेवर रोज आमचे जवान शहीद होत असताना तुमच्याशी चर्चा कशी करणार, अशा शब्दांत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आज पाकिस्तानला खडसावले. नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित पत्रकार परिषदेत सुषमा स्वराज बोलत होत्या.

लोकसभा निवडणुकीनंतर पाकिस्तानबरोबर चर्चा झाली का, असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला होता. त्यावर हिंदुस्थानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि पाकिस्तानचे अधिकारी यांच्यात चर्चा झाली होती असे स्वराज यांनी सांगितले. गिलगिट-बाल्टीस्तान या वादग्रस्त प्रदेशाला आपला पाचवा प्रांत बनवण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नावरही स्वराज यांनी टीका केली. पाकिस्तान हा कायद्यावर विश्वास नसलेला देश आहे. पाकिस्तानबरोबर चर्चेला आम्ही कधीही तयार आहोत. पण आधी दहशतवाद थांबवा. सीमेवर घुसखोरी सुरू आहे. गोळ्यांचा पाऊस पडतोय. अशा परिस्थितीत चर्चा होऊ शकत नाही,  असे त्या म्हणाल्या. डोकलाममधील परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याची माहिती त्यांनी दिली.