धक्कादायक! संशयित कोरोना रुग्णाचा मृतदेह तीन तास बस डेपोमध्ये, व्हिडीओ व्हायरल

1258

कोरोना व्हायरसने मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या मृतदेहांबाबत निष्काळजीपणा दाखवत असल्याचे प्रकार कर्नाटकात घडताना दिसत आहेत. यापूर्वी कोरोना रुग्णांचे मृतदेह खड्ड्यात फेकून देत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता एका संशयित कोरोना रुग्णाचा मृतदेह बस डेपोमध्ये तीन तास पडून असल्याचं वृत्त आहे.

न्यूज 18ने दिलेल्या वृत्तानुसार, ज्या व्यक्तिचा मृत्यू झाला तो संशयित रुग्ण होता. मारूती नगर असं या रुग्णाचं नाव आहे. मारूती यांना गेले काही दिवस ताप येत असल्याने ते कर्नाटक येथील रानीबेन्नूर तालुक्यातील रुग्णालयात तपासणी करून घेण्यासाठी आले होते. 28 जून रोजी त्यांची कोरोना तपासणी झाली. त्या चाचणीचा अहवाल घेण्यासाठी दोन दिवसांनी ते पुन्हा रुग्णालयात आले. त्यांच्या अहवालाला वेळ लागणार असल्याने त्यांनी रुग्णालय कर्मचाऱ्यांना जवळील बस आगारात थांबत असल्याचं सांगितलं आणि ते आगारात गेले.

काही वेळाने आगारातच मारूती यांचा मृत्यू झाला. याची माहिती रुग्णालयाला मिळताच रुग्णालयाचे काही कर्मचारी तिथे आले. त्यांनी मारूती यांच्या मृतदेहाला पीपीई कीटमध्ये गुंडाळलं आणि तो तिथेच ठेवून कर्मचारी तिथून निघून गेले. तब्बल तीन तास तो मृतदेह तसाच तिथे पडून होता. ही घटना पाहणाऱ्यांपैकी काहींनी व्हिडीओ बनवून व्हायरल केला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुन्हा कर्मचारी तिथे आले आणि मग त्यांनी तो मृतदेह शवागारात नेऊन ठेवला.

या प्रकरणी सामान्यांनी रुग्णालय प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनाही या घटनेची माहिती मिळाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या