बाप बनला हैवान, पत्नीच्या चारित्र्यावरील संशयावरून नवजात मुलीला विषारी इंजेक्शन टोचले

ओडिशामधील बालासोर जिल्ह्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून ओडिशातील एका व्यक्तीने आपल्या नवजात मुलीला किटकनाशकाचे औषध इंजेक्शनमधून दिले आहे. या नवजात बाळाला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून बाळाची प्रकृती गंभीर असल्याचे रूग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

बालासोरचे पोलिस अधिक्षक सागरिका नाथ यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार मंगळवार पर्यंत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. त्यामुळे आता पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार या व्यक्तीला त्याच्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. या व्यक्तीचे नाव चंदन महाना असे असून त्याला आपल्या मुलाच्या पालकत्वावर देखील संशय होता.

चंदन आणि त्याची पत्नी तन्मयी यांचे गेल्या वर्षीच लग्न झाले. 9 मे 2023 रोजी तन्मयीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. प्रसुतीनंतर तन्मयीला तिच्या माहेरी म्हणजेच सिंघरीला पाठवण्यात आले. सोमवारी चंदन आपल्या मुलीला त्याचा सासरी भेटायला गेला. तन्मयी बाथरूम मध्ये असताना तिला बाळाच्या रडण्याचा आवाज आला. बाहेर आल्यावर तिला चंदनच्या हातात इंजेक्शन आणि कीटकनाशकाची बाटली दिसली. तिने चंदनला विचारले असता त्याने सुरूवातीला ही गोष्ट नाकारली. पण वारंवार विचारल्यानंतर चंदनने इंजेक्शन दिल्याचे कबूल केले.

मुलीच्या हातावर आणि चंदनच्या हातावर रक्ताच्या खुणा आढळल्याने तन्मयीने ताबडतोब आपल्या पालकांना घटनेची माहिती दिली. तन्मयीच्या पालकांनी बाळाला तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात नेले. मात्र बाळाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जवळील शासकिय रूग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.