चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून पती फरार, शिरूरच्या टाकळी हाजी येथील घटना

टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील म्हसेफाटा येथे गुरुवारी दिनांक 22 रोजी रात्री महादेव सुरेश काळे याने पत्नी ललिता महादेव काळे हिचा चारित्र्याच्या संशयावरून कुऱ्हाडीने वार करून खून केला आहे.

म्हसे रोडवर म्हसेफाटा येथील घरकुलामध्ये पाच कुटुंब वास्तव्यास आहेत. टाकळी हाजी येथील लताबाई जीवन काळे यांचा महादेव हा जावई आहे. मूळचा सोगाव पश्चिम ,तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर येथील रहिवासी असलेला महादेव याने चार वर्षांपूर्वी ललिता हिच्याशी विवाह केला होता. त्यांचे दोघांचे कायम भांडत होत असायचे. काल गुरुवारी दिनांक 22 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास त्या दोघांचे भांडण झाले होते, आणि त्यावेळी तो पत्नीला चारित्र्यावरून जिवे मारण्याची धमकी देत होता. यावेळी त्याने ललिता हीचा कुऱ्हाडीने वार करून खून केला. याप्रकरणी ललिताची बहीण चांदणी हिने पोलिसांत तक्रार दिली आहे.

पहाटे चार वाजता मोटारसायकलचा आवाज आल्याने शेजाऱ्यांनी त्याच्या घराकडे पाहिले तेव्हा तो मोटार सायकल चालू करून पळून चाललेला दिसून आला असून त्याच्या घरात ललिता हिचा मृतदेह व त्याच्या शेजारी एक दीड वर्षाची मुलगी दिसली. त्यानंतर त्यांनी इतरांना सांगून पोलिसांना पाचारण केले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर , पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले, सहायक फौजदार नाजीम पठाण, पोलीस नाईक धनंजय थेऊरकर, पोलीस अंमलदार दिपक पवार यांनी भेट दिली असून पुढील तपास सुरू केला आहे.