उरणच्या समुद्रात ‘संशयाचे’ वादळ, बेवारस बोट सापडली; रात्री मालक हजर झाला!

दीड महिन्यापूर्वी हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर परदेशी स्पीड बोट आढळल्याची घटना ताजी असतानाच उरणच्या करंजा बंदरात संशयास्पद मच्छीमार बोट सापडल्याने खळबळ उडाली. मात्र हे झेंगट डिझेलशी संबंधित असल्याचे उघड झाले आणि रात्री बोटीचा ससून डॉक येथील मालक अकबर शेख स्वतःहून हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

रविवारी रात्री उशिरा करंजा बंदरामध्ये मत्स्य विभागाच्या अधिकाऱयांना संशयास्पद मच्छीमार बोट फिरताना दिसून आली. या बोटीवर अकबर नावाचा एक इसम होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी केली, पण कोणतीही समाधानकारक उत्तरे मिळू शकली नाही. तो नेमका कुठून आला हेसुद्धा न कळल्याने अधिकारी चक्रावले आहेत.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या मच्छीमार बोटीवर एक तांडेल होता, पण दाढी करण्याच्या नावाखाली तो बोटीतून उतरून करंजा येथील बाजारपेठेत गेला. तोही बोटीवर पुन्हा आला नाही.

डिझेलच्या तस्करांशी लागेबांधे असण्याची शक्यता

भरसमुद्रात अनेक मच्छीमार बोटी डिझेलची तस्करी करीत असतात. अशी तस्करी करण्यामध्ये या संशयास्पद बोटीचा समावेश आहे काय?, डिझेल तस्करांशी लागेबांधे आहेत का, याची सखोल चौकशी सुरू आहे.