सुझानने केली हृतिकची पाठराखण

50
हृतिक रोशन आणि सुझान खानने २०१४ मध्ये घटस्फोट तर घेतला मात्र ते आजही एकमेकांसोबत फिरताना दिसतात. हे दोघे पुन्हा लग्न देखील करणार असल्याची चर्चा आहे.

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेत्री कंगना राणौतने अभिनेता हृतिक रोशन आणि तिच्या कटू संबंधांबद्दल एका वाहिनीच्या मुलाखतीत खुलासा केला होता. त्या मुलाखतीत कंगनाने हृतिकवर अनेक आरोप केले होते. त्या आरोपांविरुद्ध हृतिकची पहिली पत्नी सुझान खानने त्याला पाठिंबा दर्शवला आहे. कोणाचंही नाव न घेता तिने आपल्या ट्विटच्या माध्यमातून हृतिकची पाठराखण केली आहे. एका चांगल्या माणसासोबत काहीही वाईट घडू शकत नाही, असं तिने या ट्विटमधून म्हटलं आहे.

एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने तिच्या आणि हृतिकच्या वादाबद्दल अनेक खुलासे केले होते. त्यात हृतिकशी लग्न करण्याची इच्छा तसंच त्याने त्याच्या घटस्फोटानंतर कंगनाकडे केलेलं दुर्लक्ष अशा अनेक गोष्टींचा समावेश होता. त्यानंतर सगळीकडे कंगना आणि हृतिकचीच चर्चा सुरू होती. त्यावर आता सुझानने असं ट्विट केल्यामुळे तिने हृतिकची पाठराखण केल्याची चर्चा होत आहे.

कंगना आणि हृतिकने काइट्स आणि क्रिश-३मध्ये एकत्र काम केलं होतं. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा दावा कंगनाने केला होता, तर हृतिकने या दाव्याला नकार दिला होता. त्यावरून त्यांच्यात वाद झाला होता. तो इतका विकोपाला पोहोचला की दोघांनीही एकमेकांना कायदेशीर नोटीस पाठवल्या होत्या. आता या मुलाखतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा हा वाद चर्चिला जात आहे. कंगना आणि सुझान यांनी आपलं मत मांडलं असलं तरी हृतिकने मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया नोंदवलेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या