आमच्याकडे तुमचे सगळे कॉल रेकॉर्ड आहेत आणि आमच्या पाठीशी केंद्र सरकार आहे! विरोधी पक्षनेत्यांची पोलीस अधीक्षकाला धमकी

पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या निवडणुका संपल्या असल्या तरी तिथलं राजकीय वातावरण अजूनही धुमसतं आहे. तिथले विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी एका पोलीस अधीक्षकांना धमकी दिली आहे. अमरनाथ के. असे या अधिकाऱ्याचे नाव असून ते पूर्व मेदिनीपूरचे पोलीस अधीक्षक आहेत. “एक पोरगेलासा अधीक्षक इथे आला आहे, अमरनाथ के. मला माहिती आहे त्याला काय करायचंय. मी ही माहीर खेळाडू आहे. मला त्यांना इतकंच सांगायचंय की तुम्ही केंद्रीय कॅडरचे अधिकारी आहात. असं काही करू नका ज्यामुळे तुमची बदली अनंतनाग किंवा बारामुल्ला इथे होईल” अशा शब्दात अधिकारी यांनी धमकावलं आहे.

तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी आणि पोलीस अधीक्षक अमरनाथ हे नातेवाईक आहेत. अधिकारी यांनी म्हटलंय की बॅनर्जी यांच्या कार्यालयात बसून अमरनाथ यांना कोणी , कुठल्या नंबर वरून फोन केले याची सगळी यादी त्यांच्याकडे आहे. अधिकारी यांनी अमरनाथ यांना धमकावताना म्हटलंय की जर तुमच्या पाठीशी राज्य सरकार असेल तर लक्षात ठेवा की केंद्र सरकार आमच्या सोबत आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना अधिकारी यांनी हे उद्गार काढले आहेत.

तृणमूल काँग्रेसने सुवेंदू अधिकारी यांच्याविरूद्धच्या सगळ्या गुन्ह्यांची चौकशी करायला सुरुवात केली आहे. टारपोलीस चोरी प्रकरणातही अधिकारी यांचा हात असल्याचा पोलिसांना संशय असून त्यांनी या प्रकरणी त्यांचा नेमका सहभाग काय होता याचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. 2018 साली सुवेंदू यांच्या सुरक्षा रक्षकाचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. पश्चिम बंगालमधील गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणाचाही कंबर कसून तपास करायला सुरुवात केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या