स्वच्छता अभियानाचा धुळे शहरात बोजवारा!

46

सामना प्रतिनिधी , धुळे

केंद्र आणि राज्य शासनाने राबविलेल्या स्वच्छता अभियानाचा धुळे शहरात बोजवारा उडाला आहे. शहरातील चाळीसगाव रोडलगत असलेल्या अंजानशाह दाता सहकारी गृह निर्माण सोसायटीच्या आवारात घाणीचे साम्राज्य वाढले आहे. महापालिकेचे कर्मचारी नियमित स्वच्छतेसाठी येत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तर दहा-बारा दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक हतबल झाले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मनपा अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे परिसराची वाताहत झाल्याची भावना संतप्त महिला-पुरुष व्यक्त करतात.

धुळे महापालिकेतील आरोग्य कर्मचाऱयांची अनास्था आणि नगरसेवकांच्या दुर्लक्षामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य झाले आहे. दहा ते बारा दिवसांनंतर होणारा पाणीपुरवठा यामुळे अंजानशाह दाता सहकारी गृह निर्माण संस्थेच्या परिसरातील नागरिक वैतागले आहेत. परिसरात घाणीचे साम्राज्य वाढले आहे. परिसरातील गटारी नियमित काढण्यात येत नाहीत. परिणामी गटारी गाळाने तुंबल्या आहेत. त्यामुळे गटारात पाणी सोडल्याने सांडपाणी रस्त्यावर येते. कचरा आणि गटारी तुंबल्यामुळे डासांसह कीटकांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे साथीच्या आजारांचे रुग्णदेखील परिसरात वाढले आहे. अंजनशाह गृहनिर्माण सोसायटीची दाट वसाहत असल्याने महापालिकेने जास्तीची स्वच्छता ठेवणे गरजेचे असल्याने महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याचा आरोप मुहम्मद मन्सुरी यांनी केला.

चाळीसगाव रोडलगत असलेल्या अंजानशाह दाता सहकारी गृह निर्माण सोसायटी परिसरात दाट वसाहत आहे. परिसरात कोठेही कचरा पेटी ठेवण्यात आलेली नाही. घंटागाडी महिना-महिना येत नाही. त्यामुळे नागरिक मोकळय़ा जागेत कचरा फेकतात. पावसाळय़ात कचरा कुजतो, त्यामुळे दुर्गंधी पसरते. परिसरात गटारी आहेत, परंतु कर्मचारी नियमित स्वच्छतेसाठी येत नाहीत. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गटारातील गाळ काढला तरी तत्काळ उचलण्यात येत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या