शिवसेनेच्या वतीने किल्ले सिंधुदुर्गवर स्वच्छता मोहीम

23
सिंधुदुर्ग किल्ल्यावर तालुका शिवसेनेच्यावतीने स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्यासह अन्य शिवसेना पदाधिकारी सहभागी झाले होते. (अमित खोत)

सामना प्रतिनिधी, मालवण

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गवर गुरुवारी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत आमदार वैभव नाईक यांच्यासह नगराध्यक्ष, तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, वायरी ग्रामपंचायत, शिवसैनिक, महिला आघाडी आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते.

सकाळपासून सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहिम सुरू झाली. काही महिन्यांपूर्वी किल्ल्यात स्थानिक रहिवासी तसेच शिवप्रेमींच्या माध्यमातून स्वच्छता मोहिम राबविण्यात आली होती. मात्र यावर्षी पाऊस उशिरापर्यंत राहिल्याने किल्ल्यात मोठ्या प्रमाणात झाडी वाढली होती. आज राबविण्यात आलेल्या मोहिमेत तटबंदीवरील झाडी, शिवराजेश्‍वर मंदिराकडे जाणार्‍या मार्गाच्या दुतर्फा तसेच अन्य भागातील झाडी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच अन्य कामगारांनी हटविली.

सकाळच्या सत्रात तालुकाप्रमुख बबन शिंदे, उपतालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक पंकज सादये, शहरप्रमुख गणेश कुडाळकर, महिला नगरसेविका, शिवसेनेचे अन्य पदाधिकारी तसेच वायरी भुतनाथ ग्रामपंचायत सरपंच ललित वराडकर, भाई ढोके यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.

दुपारच्या सत्रात आमदार वैभव नाईक यांनी किल्ला स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. सुरवातीस किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळच्या परिसरात आणि तटबंदीवर वाढलेली झाडी हटविण्यात आली. पुरातत्त्व विभागाकडून किल्ल्यात दरवर्षी साफसफाई होणे आवश्यक असल्याचे आमदार नाईक यांनी स्पष्ट केले. यावर किल्लेदार हरीश गुजराथी यांनी दरवर्षी पुरातत्त्व विभागाच्यावतीने किल्ल्यात साफसफाई केली जाते. मात्र यावर्षी ही साफसफाई झाली नाही असे स्पष्ट केले. किल्ल्याचा परिसर पाहता एक दिवसाची स्वच्छता मोहिम राबवून परिसर स्वच्छ होणे शक्य नसल्याने येत्या आठ दिवसात पुन्हा स्वच्छता मोहिम राबविली जाईल असे वैभव नाईक यांनी सांगितले.

कर वसुलीबाबत नाराजी
किल्ल्यात जानेवारी महिन्यापासून वायरी भुतनाथ ग्रामपंचायतीच्यावतीने पर्यटकांकडून कर आकारणी केली जात आहे. या कराच्या माध्यमातून किल्ल्यात फिरती शौचालये बसविण्यात आली. मात्र त्यांना पाणीपुरवठा होत नसल्याने पर्यटकांची गैरसोय होत असल्याचे आमदारांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. ग्रामपंचायत जर पर्यटकांकडून कर आकारणी करत असेल आणि कोणतीही सुविधा उपलब्ध करून देत नसेल तर कर आकारणी बंद करावी लागेल. त्यामुळे ग्रामपंचायतीने किल्ल्यात स्वच्छता राखण्यासाठीही आवश्यक उपाययोजना कराव्यात अशा सूचना आमदार नाईक यांनी यावेळी दिल्या.

आपली प्रतिक्रिया द्या