स्वाध्याय परिवार प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या पत्नी निर्मलाताईंचे देहावसान

ठाणे – स्वाध्याय परिवाराचे प्रणेते परम पूजनीय पांडुरंगशात्री आठवले यांच्या पत्नी श्रीमती निर्मलाताई आठवले (पूजनीय ताई) यांचे काल सायंकाळी म्हणजे सोमवार दिनांक ३० जानेवारी २०१७ रोजी साधारण ५ वाजण्याच्या सुमारास ठाणे येथील तत्त्वज्ञान विद्यापीठातील त्यांच्या घरी दु:खद निधन झाले. त्या ९0 वर्षांच्या होत्या. उद्या बुधवार दिनांक १ फेब्रुवारी २०१७ रोजी ४ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. 
निर्मलाताईंचा जन्म ३ ऑगस्ट १९२६ रोजी रत्नागिरी तालुक्यात झाला. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्याशी विवाह झाल्यानंतर निर्मलाताईंनी त्यांच्या कार्यास हातभार लावला. स्वाध्याय कार्यात निर्मलाताईंचं मोठं योगदान होतं. स्वाध्याय कार्यातील बंधु-भगिनींसाठी त्यांचे मोलाचे मार्गदर्शन कायम लाभत होते. दादांच्या निधनानंतर ताई ठाणे येथील तत्त्वज्ञान विद्यापीठात वास्तव्याला होत्या. तेथेच त्या स्वाध्यायी बंधुभगिनींना मार्गदर्शन करत होत्या. लाखो स्वाध्यायींसाठी मातृवत असलेल्या ताईंच्या अचानक जाण्याने परिवारावर शोककळा पसरली आहे.
निर्मालाताईंचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी तत्त्वज्ञान विद्यापीठात ठेवण्यात आले आहे. ३१ जानेवारी ते १ फेब्रुवारी दुपारी ४ पर्यंत ताईंचे अंत्यदर्शन घेता येईल. १ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती स्वाध्याय परिवाराकडून देण्यात आली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या