मक्का मशीद बॉम्बस्फोट खटला : असिमानंदांसहित पाचजण निर्दोष सुटले

67

सामना ऑनलाईन । हैदराबाद

हैदराबाद येथील मक्का मशिदीमधील बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल ‘एनआयए’च्या नामापल्ली विशेष न्यायालयाने तब्बल अकरा वर्षांनंतर आज दिला. त्या बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी स्वामी असिमानंद यांच्यासहित पाच आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

१८ मे २००७ रोजी मक्का मशिदीत घडवण्यात आलेल्या त्या बॉम्बस्फोटात ९ जणांचा बळी गेला होता. तर ५८ जण जखमी झाले होते. या प्रकरणात सुरुवातीचा तपास सीबीआयने केला होता, पण नंतर तो तपास एनआयए म्हणजे राष्ट्रीय तपास संस्थेकडे सोपवण्यात आला होता.

हिंदू दहशतवाद नावाचा प्रकारच मुळात नव्हता
मक्का मशीद बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएच्या विशेष न्यायालयाने आज दिलेला निकाल मला तरी अनपेक्षित नाही. मला याच निकालाची आशा होती, अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृह खात्याचे माजी अवर सचिव आर. व्ही. एस. मणी यांनी व्यक्त केली. या प्रकरणातील सारे पुरावे कपोलकल्पित होते. शिवाय, हिंदू दहशतवाद नावाचा कुठलाही प्रकार त्यामागे नव्हता, असे त्यांनी निक्षून सांगितले. काँग्रेसने हिंदू ‘दहशतवाद’, ‘भगवा दहशतवाद’ अशी राळ उठवून अनेकांची प्रतिमा धुळीला मिळवली. त्याची भरपाई काँग्रेस किंवा दिशाभूल केलेले लोक कशी करणार, असा सवालही मणी यांनी केला.

आरोपी कोण होते?
या प्रकरणात एकूण १० जणांना आरोपी बनवण्यात आले होते. त्यापैकी देवेंद्र गुप्ता, लोकेश शर्मा, स्वामी असिमानंद, भरत मनोहरलाल रत्नेश्वर आणि राजेंद्र चौधरी या पाच जणांना अटक करण्यात आली होती. देवेंद्र गुप्ता याला मार्च २०१७ मध्ये राजस्थान न्यायालयाने अजमेर दर्गा बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. आजच्या निकालाने मक्का मशीद प्रकरणातून ते पाचही आरोपी निर्दोष सुटले आहेत. त्यातील असिमानंद आणि भरत रत्नेश्वर हे दोघे जामिनावर बाहेर असून तीनजण तुरुंगात आहेत. उरलेल्या पाच आरोपींपैकी संदीप व्ही. डांगे आणि रामचंद्र कल्पसांगर हे दोघे अद्यापि फरारच आहेत. एक आरोपी सुनील जोशी यांची हत्या झाली असून अन्य दोन आरोपींचा तपास सुरू आहे.

न्याय झाला नाही. ‘एनआयए’ म्हणजे आंधळा आणि बहिरा पोपट आहे. मक्का मशीद बॉम्बस्फोट खटल्यात आरोपींना मिळालेल्या जामिनाला मोदी सरकारने आव्हान दिले नव्हते. तपास पूर्णतः पक्षपाती होता.
– खासदार असदुद्दीन ओवेसी, नेते, ‘एमआयएम’

काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी ‘हिंदू दहशतवाद’ हा शब्द प्रचलित केला. त्यांच्यावर खटला भरला पाहिजे. त्या शब्दाच्या वापरामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हेच काँग्रेसचे टार्गेट होते.
-खासदार सुब्रह्मण्यम स्वामी, भाजप नेते

सर्वच तपास यंत्रणा या केंद्र सरकारच्या कळसूत्री बाहुल्या बनल्या आहेत. एनआयएचा तपास पक्षपाती होता. मक्का मशीद बॉम्बस्फोटाचा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली झाला पाहिजे.
-गुलाम नबी आझाद, विरोधी पक्षनेते, राज्यसभा

आपली प्रतिक्रिया द्या