अयोध्येत राम मंदिर होणारच!: सुब्रह्मण्यम स्वामी

40

सामना ऑनलाईन । नगर

अयोध्येत राम मंदिर होणारच असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते व खासदार डॉक्टर सुब्रह्मण्यम स्वामी यांनी व्यक्त केला आहे. हिंदूचे रक्षण करणाऱ्यांनाच मत द्या असे आवाहनही त्यांनी केले आहे.

हिंदुस्थानच्या राज्य घटनेतील तरतुदी या हिंदू संस्कृतीशी संबंधित आहेत. यामुळे या तरतुदींची अंमलबजावणी केल्यास हिंदुस्थान नक्कीच हिंदू राष्ट्र बनेल यात शंका नाही असे सुब्रह्मण्यम स्वामी म्हणाले. पंडित दीनदाळ स्मृती व्याख्यानमालेत बोलताना सुब्रह्मण्यम स्वामी यांनी ‘राष्ट्रीय आस्मिता व एकात्मता मानवतावाद’ या विषयावर आपले मत व्यक्त केले.

गोहत्या बंदी, नशाबंदी व पूजेचा अधिकार यांना घटनेने मुलभूत अधिकार मानले असले तरी ज्या पूजेमुळे समाजाचे स्वास्थ बिघडत असेल तर त्यावर सरकार नियंत्रण ठेवू शकते. देशात एकूण हिंदू ८० टक्के आहेत. हिंदूंची ही संख्या कमी होऊ देऊ नका. हिंदूंची ताकद अन्य समुदायांना माहिती आहे. त्यामुळे हिंदू एकत्र येऊ नयेत, त्यांनी संघटित होऊ नये, यासाठी अन्य शक्ती, समुदाय प्रयत्न करतात. हिंदुत्वामुळेच आपण सारे एकत्र जोडले जाणार आहोत. कन्याकुमारी पासून कश्मीरपर्यंत सारेजण हिंदुस्थानी आहेत. या सार्‍यांचे गुणसूत्र (डीएनए) एक आहे. आमच्या संस्कृतीचे नावच हिंदुस्थान आहे. त्यामुळे आत्मसन्मानाला ओळखा आपला खरा इतिहास जाणून घ्या, असेही सुब्रह्मण्यम स्वामी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या