कार्ती चिदंबरम यांना सरकारी अधिकारीच देतात ‘सिक्रेट’ माहिती!: स्वामी

21

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात सीबीायच्या फेऱ्यात अडकलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना आयकर विभाग आणि अर्थ मंत्रालयातील अधिकारीच गोपनीय माहिती पुरवत आहेत, असा आरोप भाजपचे नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केला आहे. पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून स्वामी यांनी सगळ्या गैरप्रकाराचा लेखाजोखा मांडला आहे.

स्वामी यांनी ४ ऑगस्ट रोजी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात आयकर विभाग आणि सक्तवसुली संचालनालय महत्त्वाची कागदपत्रे मिळूनही कार्ती यांच्यावर कारवाई करणे टाळत आहे, असे म्हटले आहे. अधिकारी कार्ती यांनी फितवले आहेत. हे अधिकारी कार्ती यांना महत्त्वाची माहिती देतात. तसेच कार्ती यांच्याविरोधातील कारवाई टाळण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप स्वामी यांनी केले आहेत. कार्ती यांची १४ देशांमध्ये असलेली बेहिशेबी मालमत्ता आणि २१ विदेशी खाती त्यांना अटक करण्यास पुरेशी आहेत. मात्र त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. कार्ती यांच्या अनेक फर्मच्या संचालकांच्या नावावर दाखवण्यात आलेली संपत्ती ही प्रत्यक्षात कार्ती यांच्या पत्नी व मुलीची असल्याचे तपासात उघड झाले आहे. असेही स्वामींनी पत्रात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या