बुलडाण्याला नवी ओळख देणारा स्वप्ननगरी उद्यान प्रकल्प : राधेश्याम चांडक

व्यंकटगिरीवर निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या बालाजी मंदिराच्या परिसरात निर्माण होणार्‍या जागतिक दर्जाच्या स्वप्ननगरी अ‍ॅम्युझमेंट पार्कमुळे बुलढाणा शहरालाच नव्हे तर जिल्ह्याला नवी ओळख मिळणार आहे. शेगाव येथील ‘आनंद सागर’ मुळे पर्यटनाला जो वाव मिळाला तसा वाव बुलढाण्यात देखील पर्यटनाला मिळेल आणि येणार्‍या काळात बुलढाण्याचे नाव या पार्कच्या माध्यमातून राज्यभर एक उत्कृष्ट पर्यटनस्थळ म्हणून घेतले जाईल, असा विश्वास बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी व्यक्त केला.

बुलडाणा ते मलकापूर मार्गावरील व्यंकटगिरी पर्वतावर निसर्गाच्या कुशीत वसलेल्या सुप्रसिद्ध बालाजी मंदिराला लागून तब्बल १२ एकर जागेवर ‘स्वप्ननगरी’ अ‍ॅम्युझमेंट पार्क साकारला जाणार असून आज १७ ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करुन या पार्कच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन राधेश्याम चांडक बोलत होते.

या कार्यक्रमाला आमदार हर्षवर्धन सपकाळ, भाजपा जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे, माजी आमदार विजयराज शिंदे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय गायकवाड, जि. प. सदस्या अ‍ॅड. जयश्री शेळके, बुलढाणा अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुकेश झंवर, रामोजी फिल्म सिटीचे सीईओ राजीव जालनापुरकर, बालाजी सेवा समितीचे अध्यक्ष अरुण दिवटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सुरुवातीला रामोजी फिल्म सिटीचे सीईओ राजीव जालनापुरकर यांनी या प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती दिली. बुलढाण्यात जागतिक दर्जाचा आणि उत्तम अ‍ॅम्युझमेंट पार्क होण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. अ‍ॅम्युझमेंट पार्कची संकल्पना शंभर वर्षांपूर्वी मिकी माऊसच्या रुपाने समोर आली होती. त्यावेळी छोटाश्या स्वरुपात सुरु झालेला हा मिकी माऊसचा प्रकल्प आज शंभर वर्षांनंतर मिलीयन डॉलर्सचा झाला आहे. त्याचाच एक भाग आता बुलढाण्यात साकारला जात आहे. फ्रान्स, जर्मनी, चीन, अमेरीका या देशात मोठे अ‍ॅम्युझमेंट पार्क आहेत, त्याच धर्तीवर छोटा का होईना पण बुलडाण्यातही अ‍ॅम्युझमेंट पार्क साकारला जातोय ही बुलढाणा जिल्ह्यासाठी मोठी उपलब्धी आहे, असेही त्यांनी सांगितले.

मॉडर्न आणि सुरक्षीत राईडस् या पार्कमध्ये राहतील आणि त्या माध्यमातून येथे येणार्‍यांना एक वेगळा अनुभव मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वप्ननगरी उद्यान हे बुलढाण्याच्या वैभवात भर घालणारे असून राज्यभरातील पर्यटक याकडे आकर्षीत होतील, असे सांगितले.

माजी आमदार विजयराज शिंदे यांनी सदर प्रकल्प हा मनोरंजन, सांस्कृतिक आणि धार्मिक गरजा पूर्ण करणारा महत्वाकांक्षी प्रकल्प ठरणार आहे. अंजिठा, वेरुळ, शेगाव प्रमाणेच बुलढाणाही आता महत्वाचे पर्यटनस्थळ ठरणार असून हा प्रकल्प शहरासह जिल्ह्याला लाभदायी ठरणारा प्रकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. अ‍ॅड. जयश्री शेळके यांनी या पार्कमुळे पालकांची मोठी अडचण दूर झाल्याचे सागितले. आता मुलांना कोठे बाहेरगावी घेऊन जाण्याची गरज उरणार नसल्याने मुलांसोबतच पालकांनाही दिलासा देणारा हा प्रकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.

सूत्रसंचालन चंद्रशेखर जोशी यांनी केले. बालाजी सेवा समितीचे उपाध्यक्ष संजय मोगल, सचिव राजेश पिंगळे, कोषाध्यक्ष अनिल गाढे, सहसचिव ओमप्रकाश शर्मा, किशोर पाटील, दिनकरराव जाधव, इंद्रायनीताई खोडके, संतोष पाटील यांच्यासह बालाजी भक्त परिवार, पर्यावरण मित्र व शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

आपली प्रतिक्रिया द्या