ग्रे शेड भूमिकेला पसंती

परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सलग तिसऱया आठवडय़ात धुमाकूळ घालत आहे. ‘वाळवी’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारून मराठी फिल्म इंडस्ट्रीतला चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी एका नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला आला. ग्रे शेड भूमिकेला पसंती असून ‘वाळवी’मध्ये साकारलेली भूमिका आव्हानात्मक होती, असे स्वप्नील जोशी याने सांगितले.
स्वप्नील म्हणाला, मला असं वाटतं की, जेव्हा मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी एखादा चित्रपट लिहितात, परेश मोकाशी दिग्दर्शित करतात. ‘झी स्टुडिओज’ त्याची निर्मिती करते आणि चित्रपटाचं नाव ‘वाळवी’ असतं, तेव्हा माझी नेहमीची इमेज ब्रेक झाली नाही तरच नवलच. परेश आणि मधुगंधाने मला प्रचंड कमालीची, ताकदीची अशी व्यक्तिरेखा साकारण्याची संधी दिली असून एक अभिनेता म्हणून मला याचा मनस्वी आनंद आहे. यात तुम्हाला मी ’नकारात्मक छटा असणाऱया ग्रे पॅरेक्टरमध्ये दिसतोय. एक वेगळा स्वप्नील तुम्हाला पाहायला मिळतोय. मला असं वाटतं की, फॅन्सनी माझ्याकडून आतापर्यंत मी न केलेल्या आणि आनंद देणाऱया कामाची अपेक्षा ठेवावी.