स्वप्निल सोनावणे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीचा मृत्यू

सामना ऑनलाईन । नवी मुंबई

नवी मुंबईतील गाजलेल्या स्वप्निल सोनावणे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी राजेंद्र नाईक यांचा तळोजा जेलमध्ये आजारपणामुळे मृत्यू झाला आहे. प्रेमसंबंधावरून नेरुळ येथील स्वप्निल सोनावणे याची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी मुलीचे वडील राजेंद्र नाईक यांच्यासह १३ जणांना पोलिसांनी अटक केली होती. आरोपींमध्ये मुलीची आई आणि दोन भावांचाही समावेश होता. तसेच तपासात हलगर्जी केल्याप्रकरणी दोन पोलिसांचंही निलंबन करण्यात आलं होतं.

नेरूळ येथील एसबीआय कॉलनी येथे राहणाऱ्या स्वप्नीलचे एका मुलीसोबत प्रेमप्रकरण असल्याच्या रागातून स्वप्निलची हत्या करण्यात आली होती. मुलीच्या घरच्यांना या दोघांची मैत्री मान्य नव्हती. त्यामुळेच मुलीच्या कुटुंबियांनी स्पप्निलला घरी बोलवून घेतलं आणि जबर मारहाण केली. या मारहाणीत स्वप्निलचा मृत्यू झाला. स्वप्निलला मारहाण होण्याच्या एक दिवस आधी मुलीच्या कुटुंबियांनी सोनावणे यांच्या घरी जाऊन त्यांना धमकावले होते. तेव्हा सोनावणे कुटुंबिय याबाबत तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेले असता त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. उलट पोलिसांनी स्वप्नीलचा माफीनामा लिहून घेतला होता. प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण उचलून धरल्यानंतर याप्रकरणी दोन पोलिसांचं निलंबन करण्यात आलं आणि १३ जणांना अटकही करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या