स्वरांचा उत्सव

38

नमिता वारणकर, [email protected]

सुरेश वाडकर आणि डॉ. भरत बलवल्ली… संगीत क्षेत्रातील मान्यवर, प्रतिभासंपन्न गायक… एकाच व्यासपीठावर प्रथमच ‘स्वरयज्ञ’ या कार्यक्रमाद्वारे गाणार आहेत… दोघांनीही गायलेल्या विविध शैलीच्या गाण्यांद्वारे रसिकांना सुरांच्या आनंदाची अनुभूती मिळेल हे निश्चितच… या आगळय़ावेगळय़ा कार्यक्रमानिमित्त त्यांच्याशी केलेल्या गप्पा….

संगीत संस्कृती जपावी

भावी पिढीला त्यांचं सांगणं आहे की, आपली जशी पारंपरिक संस्कृती आहे तशी संगीताचीही संस्कृती आहे,  ती जपली जाईल याकडे लक्ष असायला हवं. आजच्या जमान्यातील मुलं हुशार आहेत, तरीही आपलं मूळ विसरता कामा नये. त्यात नवीन काही घडवता आलं तर छानच, पण माणसाची नवं घडवण्याची ना ऐपत आहे ना लायकी आहे. त्यामुळे जे सादर केलं जाईल त्यामध्ये नावीन्य येईल हे पाहावं.

सुरेश वाडकर

गाण्याला सरस्वतीचा आशीर्वाद लागतो आणि श्रोत्यांची दाद मिळत राहते तसं गाणं फुलत जातं. गाणं तेच असतं. ‘भरत’चा आवाज हाय पिचचा आहे. तो व्हेरी व्हेरी ब्राईट सिंगर आणि प्रतिभावान गायक आहे. त्यामुळे त्याच्या गाण्यात मजा असते. त्यामुळे आम्ही प्रथमच एकत्र गातोय, ‘हेच ‘स्वरयज्ञ’चे वेगळेपण आहे, पंडित सुरेश वाडकर सांगतात.

 मूळ संगीत हे शास्त्रीय संगीतच आहे. उपशास्त्रीय संगीत, सिनेसंगीत, नाटय़संगीत या त्याच्या निरनिराळय़ा शाखा आहेत. यामध्ये फक्त मांडणी वेगळी असते. शास्त्रीय संगीत वेळ जास्त असल्याने हळुवार संगीताचे प्रत्येक पान उलगडता येतं. तसं लाईट म्युझिक छोटं असतं, तडफदार असतं हाच फरक आहे. सगळा बारा सुरांचा खेळ असतो. असा फरक शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताविषयी ते स्पष्ट करतात.

आजच्या संगीताविषयी त्यांचं म्हणणं आहे की, आजचं संगीत छान आहे. गाणारी मंडळी संगीतकाराने शिकवलेलं गाणं म्हणत असतात. त्यामुळे आम्हाला सगळे  प्रकार हाताळावे लागतात. सध्या लोकांची आवड जशी झालीय तसं गाणं संगीतकार बनवतात. आमचं गाण्याचं काम असल्यामुळे आम्ही फक्त गातो. चांगलं, वाईट, आजचं कालचं येणाऱया उद्याचं हा भेदभाव गाणाऱया माणसाने करू नये. संगीतकार सांगेल तो जसं गाणं बनवेल तसं गाणं गायला हवं. सगळय़ात महत्त्वाचं म्हणजे, गाणं ऐकणारे आमचे मायबाप त्यांच्या आवडीप्रमाणे गाणं तयार होत असतं.

पूर्वी आशयघन संगीताबरोबर अर्थवाही शब्द असल्यामुळे गाणं समृद्ध व्हायचं आणि आज लय, ठेक्याला महत्त्व दिलं जातं, याविषयी ते सांगतात की, आज लोकांकडे वेळ कमी आहे. त्यांना फक्त आस्वाद न घेता नाचस्वाद घेण्याचा त्यांचा अट्टाहास आहे. प्रत्येक गाणं हे नाचाचं गाणं असतं. त्यातही तुमच्या मनाची व्यथा सांगण्याचा प्रसंग, विरहाचा प्रसंग, आपण दुसऱयावर खूप प्रेम करतो हे सांगण्याचा प्रसंग यातही खूप बदल होत आहेत. त्यामुळे हल्ली गाणंही बदलतंय.

डॉ. भरत बलवल्ली

दोघांच्याही गाण्याचा पाया शास्त्रीय संगीत असला तरीही प्रत्येक गाण्याची शैली वेगळी असते. भीमरस, शृंगाररस, वीररस अशा रागांप्रमाणे गाण्याची पद्धतही बदलत जाते आणि मग ते गाणं श्रोत्याला विविध भावनांमध्ये घेऊन जात असतं. अशा अनेक राग आणि शैलींवर आधारित गाण्यांचा आनंद श्रोत्यांना एकाच वेळी, एकाच ठिकाणी घेता येणार आहे. पं. सुरेश वाडकर यांनी माझी अनेक गाणी गायली आहेत, पण दोन अनुभवसंपन्न, जाणकार गायक जेव्हा एकत्र गातात तेव्हा एक वेगळा मूड आणि फ्लेवर तयार होतो. याकरिता आम्ही अनेक बहारदार गीतांचे सादरीकरण करीत आहोत,हेच ‘स्वरयज्ञ’चे वेगळेपण आहे असं डॉ. भरत बलवल्ली सांगतात. शास्त्रीय संगीत आणि उपशास्त्रीय संगीत याविषयी तुलनात्मकदृष्टय़ा काय सांगाल असे विचारता ते सांगतात, मुळात लोकांचा गोड गैरसमज आहे की, शास्त्रीय संगीत श्रेष्ठ आणि उपशास्त्रीय संगीत कमी श्रेष्ठ. म्हणून काही गायक जेव्हा आम्ही प्युअर क्लासिकल गाणारे आहोत असे म्हणतात तेव्हा तो मूर्खपणा आहे, असं वाटतं. कारण प्रत्यक्षात सूर हा सूरच असतो.  तुम्हाला जे व्यवस्थित मांडता येत नाही त्यासाठी त्या कलेचा दोष नाही, पण काय गायलं जातंय, किती परिणामकारक गायलं जातंय, त्यांचा प्रेक्षकवर्ग किती आहे, गाणं ऐकणारा श्रोतावर्ग किती मजा घेतोय, यावरून लोकांना काय आवडतं हे ठरतं, पण संगीताचा एखादा प्रकार कमी-जास्त म्हणणे हे चुकीचे आहे. कारण गाणं हे गाणं असतं. संगीत एवढं मोठं आहे की, जेवढं कराल तेवढं कमी आहे.

चाली अमरत्वाला पोहोचतात

आजचं संगीत क्षणभंगूर आहे. ते ऐकताना, नाचताना चांगलं वाटतं. कारण नवीन साऊंड निर्माण होतात. पण जुन्या चाली जितक्या अमरत्वाला पोहोचतात तितका फक्त साऊंड अमरत्वाला पाहोचत नाही. नवीन गाणी ऐकण्याची उत्सुकता संपली की, पुढं काय असं जेव्हा होतं तेव्हा संगीत थिटं पडतं, असं बलवल्लींचं नव्या संगीताविषयी मत आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या