UP Election 2022 – बायकोचे तिकीट कापल्याने नवरा खूश

लखनऊ येथील सरोजिनी नगर मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी नवरा बायकोत भांडण सुरू झालं होतं. इथल्या विद्यमान आमदार आणि उत्तर प्रदेशातील राज्यमंत्री स्वाति सिंह या पुन्हा आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही होत्या. मात्र त्यांच्याऐवजी आपल्याला तिकीट मिळावे असा त्यांच्या नवऱ्याचा म्हणजेच दयाशंकर सिंह यांनी हट्ट धरला होता. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ अशी म्हण खरी ठरवत भाजपने या दोघांनाही तिकीट न देता राजेश्वर सिंह यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. यावर दयाशंकर सिंह यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी भाजपच्या या निर्णयावर आपण खूश असल्याचं म्हटलं आहे.

राजेश्वर सिंह आणि दयाशंकर सिंह हे दोघे एकमेकांना चांगले ओळखतात. दोघेही एकाच गावचे रहिवासी आहेत. यामुळे राजेश्वर सिंह यांना उमेदवारी मिळाल्याने दयाशंकर सिंह खूश आहेत. नवरा बायकोच्या भांडणाचा तुम्हाला फटका बसला का ? असा प्रश्न विचारला असता दयाशंकर सिंह यांनी म्हटले की असं काहीही नाहीये. जो उमेदवार निवडणूक जिंकण्याची क्षमता असलेला असतो त्यालाच पक्ष उमेदवारी देत असतो, अनेक कुटुंबांची तिकीटे कापण्यात आली असून यात चिंतेची बाब नाही असं त्यांचं म्हणणं आहे.

स्वाति सिंह भाजपला रामराम ठोकणार?

स्वाति सिंह यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर त्या समाजवादी पक्षात जाणार असल्याचे आडाखे बांधले जाऊ लागले आहेत. मुलायम सिंह यादव यांच्या सूनबाई अपर्णा यादव यांना भाजपने आपल्याकडे वळवत यादव कुटुंबात फूट पाडली होती. त्याचा वचपा काढण्यासाठी समाजवादी पक्ष स्वाति सिंह यांना आपल्या पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत असल्याच्या अफवा पसरायला लागल्या आहेत. समाजवादी पक्षाने सरोजिनी नगर मतदारसंघात त्यांचा उमेदवार कोण असेल, याची अद्याप घोषणा केलेली नाहीये.